केंद्रातील सत्तेसाठी आवश्यक असलेल्या २७२ जागा जिंकण्याकरता भारतीय जनता पक्षाने ‘व्हिजन- २७२ प्लस’ तयार केले असून आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी मतदान केंद्र पातळीपासून सुरू करण्यात आली आहे. तयारीच्या पहिल्या टप्प्यात राज्यात ८४ हजार बूथसाठी नियुक्त केलेल्या दोन लाख कार्यकर्त्यांचा मुंबईत महामेळावा आणि त्यानंतर २६ मतदारसंघात आंदोलने, मेळावे असा कार्यक्रम राज्यात सुरू करण्यात येत असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक बालेवाडी येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचा समारोप बुधवारी नितीन गडकरी यांच्या भाषणाने झाला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले की, लोकसभेसाठी पक्षाचे ‘व्हिजन- २७२ प्लस’ तयार झाले असून त्यानुसार निवडणुकीची व्यूहरचना निश्चित करण्यात आली आहे. राज्यात ८४ हजार निवडणूक बूथसाठी प्रत्येकी दहा कार्यकर्ते नियुक्त करण्याचा कार्यक्रम आम्ही दिला आहे. आतापर्यंत ५७ हजार बूथची नोंदणी पूर्ण झाली आहे. या बूथ प्रमुखांचा महामेळावा पुढील महिन्यात मुंबईत भरवण्यात येणार आहे. पक्षाध्यक्ष राजनाथसिंह त्यासाठी येणार आहेत. त्यानंतरच्या टप्प्यात भाजपने लढवलेल्या २६ लोकसभा मतदारसंघांत महागाई विरोधात आंदोलने तसेच मेळावे असे कार्यक्रम होतील. या मेळाव्यांमध्ये माझ्यासह गोपीनाथ मुंडे, विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांची प्रमुख उपस्थिती असेल.
संघटनात्मक बांधणी तसेच जनतेच्या प्रश्नांवर आंदोलने करताना केंद्र सरकारचे अपयश आणि सर्व आघाडय़ांवर देशातील परिस्थिती बिघडण्यासाठी केंद्र सरकारच कसे जबाबदार आहे या बाबी जनतेपर्यंत पोहोचवण्याची काळजी आंदोलने करताना भाजप घेणार आहे, असेही सांगण्यात आले.
मराठा आरक्षणाला पाठिंबा
मराठा समाजाने आरक्षण मागताना नोकऱ्या तसेच शिक्षण आदी ठिकाणी आरक्षण मागितले आहे. राजकीय आरक्षण मागण्यात आलेले नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण द्यायला भारतीय जनता पक्षाची पूर्ण संमती आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Story img Loader