मावळ लोकसभेच्या रिंगणात ‘संशयकल्लोळ’ असतानाच रविवारी त्यात नव्याने भर पडली. शिवसेनेतून बाहेर पडलेले खासदार गजानन बाबर यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. प्रत्यक्षात त्यांनी रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेतल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. त्यातच, चिंचवड येथे शेकाप व मनसेच्या पाठिंब्यावर रिंगणात असलेले लक्ष्मण जगताप यांनी बाबरांची भेट घेऊन बराच वेळ ‘गुफ्तगू’ केल्याने सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत.
विद्यमान खासदार असूनही तिकीट कापल्याने नाराज असलेले बाबर नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वाचे लक्ष आहे. बाबर समर्थकांनीही शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर हा गट मनसेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. तथापि, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी भेट झाल्यानंतरच याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. मनसेने यापूर्वीच जगतापांना पाठिंबा दिला असून त्यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांच्या जाहीर सभाही होणार आहेत. रविवारी चिंचवड स्टेशन येथे जगतापांनी बाबरांची भेट घेतली. दोहोंमध्ये बराच वेळ चर्चा झाली. मात्र, चर्चेचा तपशील गुलदस्त्यात राहिला. जगताप सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तत्पूर्वी, ‘आशीर्वाद’ घेण्यासाठी जगताप आले होते आणि बाबरांनी त्यांना ‘शुभेच्छा’ दिल्याने नेमके काय ‘राज’ कारण सुरू आहे, याविषयी तर्कवितर्क सुरू आहेत.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा