पुण्यातील नऊ सायकलप्रेमी ज्येष्ठ नागरिकांनी ताडोबा, नवेगाव नागझिरा आणि पेंच हे तीन व्याघ्र प्रकल्प पालथे घालत सायकलवरून एकूण ७५० किलोमीटरचा प्रवास केला आहे. वन विभागाच्या सहकार्याने आखलेल्या या मोहिमेत या सायकलस्वारांनी त्या-त्या भागातील स्थानिकांशी चर्चा करून वाघ वाचवण्याची गरज काय, या विषयावर प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला.
सामाजिक वनीकरण खात्याचे उपसंचालक विजय हिंगे यांच्यासह पुण्यातील सायकलप्रेमींच्या गटातील अविनाश मेडेकर, हेमंत थिंगळे, दत्तात्रय गोखले, पद्माकर आगाशे, माणिक पवार, सतीश रेंगे, अरविंद चितळे आणि लहू यांचा समावेश होता. प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री भगवान यांनी मोहिमेचे नागपूरला वनविभागातर्फे सोमवारी स्वागत केले.
हिंगे म्हणाले, ‘आम्ही प्रथम रेल्वेने वध्र्याला व तिथून यवतमाळला पोचलो आणि यवतमाळहून १ फेब्रुवारीला सायकलवर प्रवास सुरू केला. यवतमाळहून प्रथम कोळसा खाणींच्या भागातील वणी आणि तिथून ताडोबामार्गे चंद्रपूरला गेलो. चंद्रपूरहून नवेगाव, नागझिरा व भंडारामार्गे रामटेकला गेलो आणि पुढे पेंचमार्गे ८ तारखेला नागपूर येथे पोचलो. दररोज सलग अंदाजे १०० ते १२० किलोमीटरचे सायकलिंग झाले. वाटेत आम्हाला स्थानिकांची खूप मदत झाली. ‘वाघ सुरक्षित तर पर्यावरण सुनिश्चित’ असे मोहिमेचे घोषवाक्य ठरवले होते. आम्ही जिथे थांबत होतो तिथे लोक जमा व्हायचे. तेव्हा निसर्गाच्या अन्नसाखळीत वाघाचे महत्त्व काय, या विषयावर बोलत होतो.’
संयुक्त वन व्यवस्थापन समित्या आणि चंद्रपूरमधील आत्महत्याग्रस्त शेतक ऱ्यांच्या कुटुंबांशीही सायकलस्वारांच्या गटाने चर्चा केल्याचे हिंगे म्हणाले. ‘कमी होत चाललेला गवताळ प्रदेशाचा भाग, कमी दिवस पाऊस पडू लागल्यामुळे जाणवणारे पाण्याचे दुर्भिक्ष्य, तसेच सायकलिंग व पायी चालण्याचा आरोग्यासाठी असलेला उपयोग, अशा विविध विषयांवर स्थानिकांशी चर्चा केली,’ असे त्यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा