पुणे : गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार विठ्ठल शेलार आणि त्याचा साथीदार रामदास मारणे यांची दहशत मोडीत काढण्यासाठी धिंड काढण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी शेलार आणि मारणेच्या पोलीस कोठडीत २४ जानेवारीपर्यंत वाढ करण्याचा आदेश दिला.
शेलार आणि मारणे यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. शेलारची पुनावळे भागात धिंड काढण्यात आली, तसेच रामदास ऊर्फ वाघ्या मारणे याची मुळशी परिसरात पोलिसांनी धिंड काढली. मुळशी तालुक्यातील गुंडांना जरब बसण्यासाठी पोलिसांनी धिंड काढल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी न्यायालयात दिली.
हेही वाचा – मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी पुण्यात जय्यत तयारी
मोहोळचा खून झाल्यानंतर पळून जाण्यासाठी शेलार याने वापरलेली जीप पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका साक्षीदाराचा शोध घेतला असून, गुन्हा घडण्यापूर्वी तो गणेश मारणे याच्या संपर्कात होता. गुन्हा घडल्यानंतर तो शेलार याच्या संपर्कात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. शेलार आणि मारणे यांच्याकडे तपास करायचा आहे. खून करण्यापूर्वी मुख्य सूत्रधार शेलार आणि गणेश मारणे यांची भेट झाली होती. त्यांनी मोहोळला मारण्याचा कट रचला होता. ते ठिकाण शेलार याने पोलिसांना दाखविले आहे, असे सहायक पोलीस आयुक्त तांबे यांनी न्यायालयात सांगितले.
हेही वाचा – महिलेचा खून करून मृतदेह जमिनीत पुरल्याचा प्रकार उघड; पतीसह दोघे अटक; दीर फरार
या गुन्ह्याचा सखोल तपास करायचा असल्याने पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती ॲड. नीलिमा इथापे-यादव यांनी न्यायालयाकडे केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी शेलार आणि मारणेच्या पोलीस कोठडीत २४ जानेवारीपर्यंत वाढ करण्याचा आदेश दिला.