चिन्मय पाटणकर chinmay.reporter@gmail.com
बहुरंगी, बहुढंगी कलाकार पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त महाराष्ट्र कल्चरल सेंटरने पुलंचे ‘एक झुंज वाऱ्याशी’ हे नाटक रंगमंचावर आणले आहे. नाटककार विवेक बेळे यांनी या नाटकातून अभिनेता म्हणून रंगमंचावर पुनरागमन केलं आहे.
ललित साहित्यासह नाटय़क्षेत्रातही पु. ल. देशपांडे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्टँडअप कॉमेडीपासून प्रयोगशील नाटकांपर्यंत लक्षणीय प्रयोग पुलंनी केले. त्यात पुलंनी रूपांतरित केलेली ती फुलराणी, एक झुंज वाऱ्याशी अशी नाटकं वैशिष्टय़पूर्ण आहेत. ती अशासाठी की नाटकाचं मूळ परकीय भाषेत असूनही त्याला पुलंनी अस्सल भारतीय किंवा मराठी रुपडं दिलं. पुलंचं जन्मशताब्दी वर्ष साजरं केलं जात असताना महाराष्ट्र कल्चरल सेंटरने एक झुंज वाऱ्याशी हे नाटक रंगभूमीवर आणलं असून, या वर्षभरात त्याचे विविध ठिकाणी प्रयोग केले जाणार आहेत.
‘एक झुंज वाऱ्याशी’ हे व्लादेन दोदतसेव्ह यांचं मूळ नाटक. त्याचं पुलंनी मराठीत रूपांतर केलं. नव्या संचात या नाटकाचं दिग्दर्शन सचिन जोशी यांनी केलं आहे. प्रदीप वैद्य यांनी नेपथ्य, अपूर्व साठे यांनी प्रकाशयोजना, नरेंद्र भिडे यांनी संगीत, अमिता घुगरी यांनी संगीत संकलन, मिहीर ओक यांनी संगीत संयोजन केलं आहे. राजेश देशमुख, सुनील अभ्यंकर, केतकी करंदीकर, विवेक बेळे यांनी या नाटकातील भूमिका साकारल्या आहेत. माकडाच्या हाती श्ॉम्पेन, अलीबाबा आणि चाळिशीतले चोर, नेव्हर माइंड अशी अनेक नाटकं लिहिलेल्या विवेक बेळे यांचं अभिनयाकडे झालेलं पुनरागमन हेही या नाटकाचं वैशिष्टय़ं. एक सामान्य माणूस थेट आरोग्यमंत्र्याच्या दालनात जाऊन त्यांच्याकडे राजीनामा मागतो.
जे सत्तेवर असतात त्यांनी प्रामाणिक असायला हवं, जो उपदेश ते इतरांना करतात, तो त्यांनी स्वत: आचरणात आणायला हवा असं नाटकाचं कथानक आहे. सामाजिक, राजकीय पाश्र्वभूमी असलेल्या नाटकातील विचार आजही समकालीन ठरतो. नैतिकता आणि अनैतिकता यांच्यातील संघर्ष आदिम आहे. म्हणूनच हे नाटक प्रत्येक काळाशी नातं सांगतं.
‘ज्या काळात हे नाटक पुलंनी रूपांतरित केलं किंवा रंगमंचावर आलं त्या काळाच्या दृष्टीने या नाटकातील विचार मोठा होता. लढण्यासाठी बळ आणावं लागतं, हा तो विचार. मात्र, आजही परिस्थितीत फार बदल झालेला नाही. उलट आजचं चित्र अधिक दाहक आहे. नाटकात अगदी छोटय़ा स्तरावर सुरू होणारा संघर्ष माणसाला परिपूर्ण करणं ही निसर्गाला मान्य असलेली एकच गोष्ट, या सत्याच्या साक्षात्कारापर्यंत पोहोचतो. त्याशिवाय आजच्या व्यामिश्र काळात लयदार, सौंदर्यपूर्ण भाषा आनंददायी आहे. त्या दृष्टीनं हे नाटक महत्त्वाचं आहे,’ असं दिग्दर्शक सचिन जोशीनं सांगितलं. या नाटकाचा प्रयोग शनिवारी (१५ डिसेंबर) सायंकाळी सात वाजता ज्योत्स्ना भोळे सभागृहात होणार आहे. प्रयोगाला प्रवेशमूल्य आहे.