जादूटोणा विरोधी कायद्याचे समर्थन आणि वारकऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी तेवीस युवक-युवती महाराष्ट्रातील विविध जिल्ह्य़ांध्ये ‘विवेकवारी’ घेऊन जाणार आहेत. विशेष म्हणजे हा कायदा संतविचारांचे समर्थन करणारा असून वारकरी विरोधी नाही, हे वारकऱ्यांना पटवून देण्यासाठी हे तरूण कीर्तनाचे माध्यम वापरणार आहेत.
‘आम्ही वारकरी आहोत, म्हणून आम्ही अंधश्रद्धा विरोधात आहोत,’ हे ब्रीदवाक्य घेऊन वारकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी काही युवक-युवतींनी हा उपक्रम आखला आहे. वारकऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी हे सर्वजण गावागावात कीर्तनाचे माध्यम वापरणार आहेत. ‘हा कायदा नेमका काय आहे हे वारकऱ्यांना कळावे यासाठी आम्ही हा प्रयत्न करत आहोत. वारकऱ्यार्ंपत पोहोचण्यासाठी कीर्तन हा उत्तम मार्ग असल्यामुळे प्रबोधनासाठी कीर्तनाची निवड केली,’ अशी माहिती युवाकीर्तनकार सचिन पवार याने दिली.
‘ज्या गावात कीर्तनाचा कार्यक्रम असेल, तो संपल्यानंतर त्याच गावात घरोघरी जाऊन आम्ही संबंधित कायद्याविषयीची माहिती देणार आहोत,’ असेही त्याने सांगितले. विवेकवारीची मूळ संकल्पना सचिन पवार याचीच आहे. उस्मानाबाद, लातूर, नांदेड, औरंगबाद, बीड, जालना, सोलापूर आदी जिल्ह्य़ांमध्ये जाऊन जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रसार या उपक्रमता केला जाणार आहे. वारकऱ्यांमध्ये कायद्याबद्दल खोटा प्रचार केला जात आहे. त्यामुळे कायद्याचे खरे स्वरूप वारकऱ्यांसमोर यावे. तसेच संतांचे पुरोगामी विचारही सर्वदूर पोहोचवावेत यासाठी हरिकीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर विवेकवारी फिरणार आहे.
 विवेकवारीमध्ये विधी, पत्रकारिता, मानसशास्त्र अशा विविध अभ्यासक्रमांचे तेवीस युवक-युवती सहभागी होतील. या उपक्रमासाठी येणारा खर्च प्रत्येकजण स्वत:हूनच करणार आहे. ही वारी ३१ ऑक्टोबर रोजी तुळजापूर येथून सुरू होणार असून ७ नोव्हेंबर रोजी पुण्यात वारीचा समारोप होणार आहे. हा कार्यक्रम ७ नोव्हेंबर रोजी नवी पेठ येथील पत्रकार भवन येथे सायंकाळी ६ वाजता डॉ. सदानंद मोरे यांच्या उपस्थितीत होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा