पुणे जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील मतदार यादीमध्ये असलेली दुबार नावे, मयत झालेल्या व्यक्तींची नावे, कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे या संदर्भात माहिती घेऊन मतदार याद्यांमध्ये सुधारणा करून त्या परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने आगामी काळात प्रयत्न करण्यात येतील,तसेच मतदार यादीमध्ये चुकीच्या पद्धतीने नाव समावेश केले असेल तर प्रशासनातर्फे त्यात सुधारणा करण्यात येईल.
या सर्व कामामध्ये पारदर्शकता ठेवली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली. यावेळी जितेंद्र डूडी म्हणाले,मतदार यादीत दोन ठिकाणी नाव असलेल्या मतदारांची नावे वगळण्यात येऊन एकाच मतदार यादीत नाव असेल याची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत खात्री केली जाईल.
मतदार याद्यांमधील मयत मतदारांची नावे वगळण्यात येतील, यासाठी ग्रामपंचायत,नगरपरिषद, महानगरपालिका या कार्यालयांकडून मयत झालेल्या व्यक्तींच्या अभिलेख नोंदीच्या याद्या घेऊन त्याप्रमाणे मतदार यादीमध्ये मयत झालेल्या व्यक्तींची नांवे कमी करण्यात येतील.तसेच कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या मतदारांच्या बाबतही बीएलओमार्फत सर्वेक्षण करण्यात येऊन याद्यांमध्ये सुधारणा करण्यात येईल. या कामांसाठी प्रशासनातर्फे बीएलओंना प्रशिक्षण देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.