पुणे : पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांसाठी सोमवारी (दि. १३ मे) मतदान पार पडले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा पुण्यात मतदानाची टक्केवारी वाढली असून शिरूर आणि मावळ मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घटल्याचे सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यात प्रमुख लढत झाली आहे. परंतु, या मतदारसंघातून एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रिंगणात असल्याने मतदानात फुट पडणार असल्याची चर्चा होती. पुणे लोकसभा मतदारसंघात २०१९ मध्ये ४९.८२ टक्के मतदान झाले होते.

यंदा सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४५ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे शेवटच्या तासात मतदानाची टक्केवारी ५५ टक्क्यांपर्यंत जाईल, अशी शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली. त्यामुळे वाढलेले मतदान कोणाच्या फायद्याचे ठरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पुण्यात पहिल्या दोन तासात ६.६१ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर पुण्यात सकाळी मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने सकाळी ११ वाजेपर्यंत मतदाना १० टक्क्यांची वाढ होऊन १६.१६ टक्के मतदान झाले. दुपारी एक वाजेपर्यंत २६.४८ टक्के, दुपारी तीन वाजेपर्यंत ३३.०७ टक्के, पाच वाजेपर्यंत ४४.०९ टक्के मतदान झाले. मात्र सायंकाळी पाच नंतर पावसाला सुरुवात झाल्याने मतदान केंद्रांवर अपेक्षित गर्दी ओसरली. त्यामुळे अखेरच्या तासाभरात मतदानाचा टक्का घटल्याची स्पष्टोक्ती जिल्हाधिकारी डाॅ. सुहास दिवसे यांनी दिली.

Gautami Patil News
Gautami Patil : राजकारणात जाणार का? गौतमी पाटील म्हणाली, “मी..”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…

हेही वाचा : मावळ लोकसभा: रायगड जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात फेर मतदान व्हावे असे श्रीरंग बारणे का म्हणाले?

पुणे लोकसभा मतदारसंघातून सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्वाधिक ५१.०७ टक्के मतदान कसबा विधानसभा मतदारसंघात मतदान झाले. त्याखालोखाल कोथरूडमध्ये ४८.९१ टक्के, पर्वती ४६.८० टक्के, पुणे कॅन्टोन्मेंट ४४.०१ टक्के, वडगावशेरी ४०.५० टक्के आणि सर्वात कमी शिवाजीनगर मतदारसंघात ३८.७३ टक्के मतदान झाले.

शिरूर लोकसभा मतदारसंघात ३२ उमेदवार असून महायुतीकडून शिवाजी आढळराव पाटील तर महाआघाडीकडून डाॅ. अमोल कोल्हे यांच्या प्रमुख लढत आहे. मतदारसंघात २०१९ मध्ये ५९.३७ टक्के मतदान झाले होते. प्रशासनाकडून अंदाजे ५० ते ५२ टक्के मतदान होण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्षी शिरूर लोकसभा मतदारसंघात पहिल्या दोन तासात ४.९७ टक्के, तर ११ वाजेपर्यंत १४.५१ टक्के, दुपारी एक वाजेपर्यंत २०.८९ टक्के, दुपारी तीन वाजेपर्यंत ३६.४३ टक्के मतदान झाले. मात्र दुपारी साडेतीन नंतर भोसरी, जुन्नर आणि खेड परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाल्याने मतदान केंद्रांवरील गर्दी ओसरली. परिणामी पाच वाजेपर्यंत ४३.८९ टक्के मतदान झाले. पाचवाजेपर्यंत सर्वाधिक आंबेगाव विधानसभा मतदारसंघात ५३.७१ टक्के, त्या खालोखाल खेड-आळंदी ४८.०७ टक्के, जुन्नर ४७.३१, भोसरी ४२.२४ टक्के, शिरूर ४१.१५ टक्के, तर सर्वात कमी हडपसर मतदारसंघात ३८.०४ टक्के मतदान झाले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दिली.

हेही वाचा : शिरूरमध्ये मतदानापूर्वीच मतदानयंत्रे पडली बंद, झाले काय?

मावळ लोकसभा मतदारसंघात ३३ उमेदवार रिंगणात असून या ठिकाणी देखील महायुतीचे श्रीरंग बारणे विरूद्ध महाआघाडीचे संजोग वाघेरे यांच्यातच प्रमुख लढत आहे. २०१९ मध्ये मतदारसंघात ६०.११ टक्के मतदान झाले होते. मावळ मतदारसंघात पहिल्या दोन तासात ५.३८ टक्के मतदान झाले होते. सकाळी ११ वाजेपर्यंत १४.८७ टक्के, दुपारी एक वाजेपर्यंत २७.१४ टक्के, दुपारी तीन वाजेपर्यंत ३६.५४ टक्के, पाच वाजेपर्यंत ४६.०३ टक्के मतदान झाले. या मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान उरण विधानसभा मतदारसंघात ५५.०५ टक्के, त्या खालोखाल मावळ ५०.१२ टक्के, कर्जत ४९.०४ टक्के, चिंचवड ४३.३३ टक्के, पनवेल ४२.२४ टक्के आणि सर्वात कमी मतदान ४२.२० टक्के मतदान झाले.