राष्ट्रवादीला खिंडार पडले, काँग्रेस फुटली, इथपासून ते शिवसेना-भाजपची युती होईल का, दोन्ही काँग्रेसची आघाडी होईल का, सत्ता कोणाची येईल, असे अनेक प्रश्न शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. महापालिका निवडणुका कधीही जाहीर होतील, असे गृहीत धरून ‘हौशे’, ‘नवशे’, ‘गवशे’ सगळेच कामाला लागले आहेत. राष्ट्रवादीला पुन्हा निर्विवाद बहुमत मिळवून सत्तेची ‘हॅट्ट्रिक’ साधायची आहे. तर, भाजप-शिवसेनेला युतीचा ‘भगवा’ फडकवून सत्तेची सूत्रे आपल्या ताब्यात घ्यायची आहेत. काँग्रेसला गतवैभव प्राप्त करायचे आहे, तर मनसे, रिपाइं, एमआयएम यांना आपले अस्तित्व दाखवून द्यायचे आहे. एकजात सगळे सारखेच आहेत, अशी भावना असलेला ‘मतदार राजा’ नेमका कोणाच्या पारडय़ात कौल देऊन सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात देतो, हे लवकरच स्पष्ट होईल.

राजकीय वर्तुळात ज्याची आतुरतेने वाट पाहिली जात होती, त्या महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम आठवडय़ाभरात कोणत्याही दिवशी जाहीर होईल आणि लगोलग आचारसंहिता लागू होईल, अशी चिन्हे दिसू लागल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय घडामोडी कमालीच्या वेगवान झाल्या आहेत. उद्घाटने आणि भूमिपूजनांचा धडाका सुरू आहे. इतकी वर्षे ज्या पक्षासोबत संसार केला, त्यांच्यापासून ‘काडीमोड’ घेत नव्याने ‘घरोबा’ करण्याचा सपाटा अनेक नगरसेवकांनी लावला आहे. मोक्याच्या क्षणी ‘आयाराम-गयाराम’चा हंगाम सुरू झाला आहे. काँग्रेस पक्षाचे सात नगरसेवक नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, त्याआधीच नऊ नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत २५ नगरसेवकांनी पक्ष बदलला, अजूनही बराच गोतावळा इकडून तिकडे जाण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे पक्षनिष्ठेची ऐशीतैशी झालेलीच आहे. ‘दलबदलूं’चा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला बसला आहे. त्यामुळेच िपपरी-चिंचवडचे ‘कारभारी’ अजित पवार यांचे शहरातील दौरे वाढले आहेत. एका महिन्यात सहा वेळा हजेरी लावून त्यांनी पक्षाची खुंटी बळकट करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. सत्तेत असताना क्वचित फिरकणारे दादा आता मात्र दिवस दिवसभर शहरात तळ ठोकून बसलेले दिसतात. गेल्या जवळपास १५ वर्षांपासून पालिकेच्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला सत्तेबाहेर घालवण्यासाठी विरोधकांची रणनीती वेगवेगळय़ा प्रकारे सुरू आहे. भाजपने राष्ट्रवादीच्या विरोधात आरोपांचे सत्र सुरू ठेवले असून, पालिकेतील भ्रष्टाचाराची एकेक प्रकरणे चव्हाटय़ावर आणण्याचे धोरण ठेवले आहे. शिवसेनेने पक्षाच्या अंतर्गत बांधणीवर भर दिला आहे. काँग्रेसला गेल्या काही दिवसांमधील गळतीमुळे निर्माण झालेला खड्डा भरून काढण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपुढे तर अस्तित्वाचाच प्रश्न आहे.

दहा वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर राष्ट्रवादीची पुन्हा सत्ता येईल, असा ठाम विश्वास अजित पवारांना आहे. त्यामुळे प्रत्येक दौऱ्यात विकास एके विकास असाच घोषा त्यांनी लावला आहे. प्रत्यक्षात तशी परिस्थिती आहे का, याविषयी साशंकता आहे. कारण, अजित पवारांचे फक्त नाव होते, सत्ता मिळवून देणारे शिलेदार वेगळेच आहेत. विलास लांडे, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आझम पानसरे, संजोग वाघेरे, अण्णा बनसोडे, हनुमंत गावडे, योगेश बहल, मंगला कदम अशी स्थानिक नेत्यांची फळी होती.

या सर्वाची एकत्रित ताकद म्हणून राष्ट्रवादीला सत्ता मिळत होती. आता जगताप व लांडगे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. त्यांच्याकडेच भाजप नेतृत्वाची धुरा आहे. विधानपरिषदेची उमेदवारी पिंपरीत न देता पुण्यात दिल्याने आझम पानसरे, विलास लांडे तीव्र नाराज आहेत. ते नेमके काय करतील, याचा नेम नाही. शरद पवारप्रेमी पानसरे यांना भाजपकडून पक्षप्रवेशाची ‘ऑफर’ आहे. त्यादृष्टीने चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत, मात्र अंतिम शिक्कामोर्तब नाही. भाजप-शिवसेनेशी गुफ्तगू झाल्यानंतर विलास लांडे तूर्त राष्ट्रवादीत राहिले असले तरी त्यांच्याविषयी खात्रीने कोणी काही सांगू शकत नाही. शहराध्यक्ष संजोग वाघेरे पत्नी उषा यांच्यासाठी, तर गावडे हे मुलगा विजय यांच्यासाठी प्रभागात अडकून पडण्याची शक्यता आहे. बहल, कदम विरोधकांच्या रडारवर आहेत. त्यांना जेरीस आणण्याची कोणतीही संधी विरोधक सोडणार नसल्याने त्यांच्या मुक्त संचारावर मर्यादा पडण्याची शक्यता आहे. स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळवताना दहा नगरसेवक निवडून आणण्याची ग्वाही डब्बू आसवानी यांनी दिली. प्रत्यक्षात त्यांचे स्वत:चे निवडून येण्याचे ‘वांदे’ आहेत. एकीकडे अशी परिस्थिती, तर दुसरीकडे संपूर्ण शहरभरात प्रभाव असणारा चेहरा राष्ट्रवादीत नाही. कोणा एकाचे नेतृत्व मान्य होईल, असेही नाही. निवडणुकाजिंकण्यासाठी स्थानिक पातळीवर ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात, त्या अजित पवार करू शकत नाहीत. अजित पवारांच्या तालमीत तयार झालेले लांडगे, जगताप हे मल्ल वस्तादाशीच ‘दोन हात’ करायला निघाले आहेत. राष्ट्रवादीला लागलेली गळती थांबण्याची चिन्हे नाहीत. अशा परिस्थितीत अन्य कोणावर विसंबून न राहता ‘एकला चलो रे’ म्हणत अजित पवारांनी स्वत:च्या खांद्यावर सगळी धुरा घेतली आहे.

सक्षम पर्याय देण्याचा दावा भाजप-शिवसेना करत असले आणि त्यादृष्टीने चांगले वातावरण असले तरी युतीच्या चर्चेची गाडी पुढे जात नाही. दोन्ही पक्षांतील नेत्यांचा एकमेकांवर विश्वास नाही. भाजपमधील ‘गृहकलह’ धोकादायक ठरू शकतो, अशा पातळीवर आहे. तर सेनेत थोडय़ाफार फरकाने तशीच धुसफुस आहे.

इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा हंगाम सुरू आहे. काही अपवाद वगळता मुलाखती म्हणजे ‘फार्स’ असल्याची भावना अनेकांच्या मनात आहे.

ठराविक उमेदवारांना नेत्यांनी ‘हिरवा कंदील’ केव्हाच देऊन ठेवलेला आहे. इतरांची मात्र सहामाही आणि वार्षिक परीक्षा घेतली जात असल्याचा सूर राजकीय कार्यकर्त्यांमध्ये आहे. वेगवेगळी कारणे देत झुलवत ठेवण्यात आलेले कार्यकर्ते प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत राहात नाहीत, हा पूर्वानुभव आहे. नेते इच्छुक उमेदवारांशी बनवाबनवी करतात, हे सर्रास दिसून येते. मात्र, नेत्यांना कार्यकर्तेही बनवतात, याची अनेक उदाहरणे आहेत. सकाळी एका पक्षाकडे तर सायंकाळी दुसऱ्या पक्षाकडे इच्छुक उमेदवार कमी नाहीत. भाजप आणि राष्ट्रवादीत दुहेरी इच्छुक बरेच आहेत. आता निवडणुका जाहीर होतील. सत्ताप्राप्तीचे दावे-प्रतिदावे केले जातील. ‘मतदार राजा’ नेमका कोणाच्या पारडय़ात कौल देतो, हे लवकरच स्पष्ट होईल.

 

Story img Loader