पुणे शहरातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या असून, आठ लाख मतदार या दोन्ही मतदार संघांचे नवे आमदार ठरविणार आहेत.
हेही वाचा- श्रीगौड ब्राह्मण जातपंचायतीच्या मनमानीमुळे ४०० विवाह रखडले
जिल्हा निवडणूक शाखेकडून पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील मिळून एकूण २१ विधानसभा मतदारसंघांची अंतिम मतदारयादी ५ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आली आहे. हीच यादी या दोन्ही मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहे. त्यानुसार कसबा पेठ मतदारसंघात दोन लाख ७५ हजार ४२८, तर चिंचवडमध्ये पाच लाख ६६ हजार ४१५ मतदार आहेत.
कसब्यात प्रारूप मतदार यादीत दोन लाख ७४ हजार ३७७ मतदार होते. अंतिम यादीत १०५१ मतदार वाढले आहेत. या मतदारसंघात सध्या दोन लाख ७५ हजार ४२८ मतदार आहेत. तर, चिंचवड मतदारसंघात प्रारूप मतदार यादीत पाच लाख ६१ हजार ९८८ मतदार होते. या मतदारांत ४४२७ ने वाढ झाली असून अंतिम मतदारयादीत पाच लाख ६६ हजार ४१५ मतदार झाले आहेत. दरम्यान, प्रारूप मतदार यादी गेल्या वर्षी ९ नोव्हेंबरला जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर नवमतदार, समाजातील वंचित घटकांसाठी मतदार नोंदणीच्या खास मोहिमांचे आयोजन केले होते. त्यामुळे प्रारूप मतदार यादीनंतर अंतिम यादीत मतदार वाढले आहेत.
हेही वाचा- उच्च शिक्षण संस्थांचे नव्या निकषांद्वारे मूल्यांकन; ‘नॅक’कडून नवे निकष, गुणभार जाहीर
मतदार म्हणून नाव कसे शोधाल?
मतदार यादीत नाव आहे किंवा कसे, हे http://www.nvsp.in या संकेतस्थळावर किंवा voters helpline या मोबाइल उपयोजनवर (ॲप) संपूर्ण नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ ही माहिती भरल्यानंतर समजेल.
कसबा, चिंचवड मतदारसंघांचा आढावा
मतदारसंघ पुरूष महिला तृतीयपंथी एकूण मतदार
कसबा १,३६,८७३- १,३८,५५० -५ २,७५,४२८
चिंचवड ३,०१,६४८ -२,६४,७३२- ३५ ५,६६,४१५
हेही वाचा- उत्तरेकडे थंडीचा कहर, महाराष्ट्रात गारवा घटणार; राजधानी दिल्लीत थंडीच्या लाटांचा विक्रम
कसब्याचा आमदार महिला ठरविणार
नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीनुसार कसब्यात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या मतदारसंघाचा आमदार महिला मतदार ठरविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.