पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (१३ मे) मतदान होणार आहे. दोन हजार ५६६ मतदान केंद्रावर २६ लाख मतदार हक्क बजाविणार आहेत. मावळमध्ये एकूण ९ हजार २३६ बॅलेट युनिट, ३ हजार ५९१ कंट्रोल युनिट तर ३ हजार ८१६ व्हीव्हीपॅट यंत्र लागणार आहेत. या साहित्याचे रविवारी वाटप करण्यात आले.
पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये ६ विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या मतदारसंघात २५ लाख ८५ हजार १८ मतदार असून यामध्ये १३ लाख ४९ हजार १८४ पुरूष मतदार, १२ लाख ३५ हजार ६६१ महिला मतदार आणि १७३ तृतीयपंथी मतदार आहेत. ३३ उमेदवार निवडणुकीसाठी रिंगणात आहेत. दोन हजार ५६६ केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. चिंचवडमध्ये ५४९, पिंपरीत ४००, मावळमध्ये ३९०, पनवेलमध्ये ५४४, कर्जत ३३९ आणि उरणमध्ये ३४४ असे एकूण दोन हजार ५६६ मतदान केंद्र आहेत. केंद्रावर एकूण ११ हजार ३६८ मतदान अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले गेले आहेत. तसेच संवेदनशील मतदान केंद्रांवर ८३ सूक्ष्म निरीक्षक देखील नियुक्त करण्यात आले आहेत.
हेही वाचा…करोनाच्या नवीन उपप्रकाराचा पुण्यात शिरकाव; राज्यात रुग्णसंख्या किती?
विधानसभा मतदार संघानुसार मतदार
विधानसभा मतदार संख्या
पनवेल ५ लाख ९१, ३९८
कर्जत ३ लाख ९,२०८
उरण ३ लाख १९, ३११
मावळ ३ लाख ७३,४०८
चिंचवड ६ लाख १८, २४५
पिंपरी ३ लाख ७६, ४४८
एकूण २५ लाख ८५ हजार १८
३४ आदर्श मतदान केंद्र
महिला, युवा तसेच संस्कृती जोपासणाऱ्या मतदान केंद्रासह ३४ आदर्श मतदान केंद्र असणार आहेत. विधानसभा मतदारसंघ निहाय अशी केंद्रे स्थापित करण्यात येणार आहेत. यामध्ये १४ महिला संचलित मतदान केंद्र, १४ युवा संचलित मतदान केंद्र आणि सहा संस्कृती जोपासणारे आदर्श मतदान केंद्र असे एकूण ३४ मतदान केंद्र स्थापित केले जाणार आहेत.
हेही वाचा…निर्यातबंदी उठवल्यानंतरही कांदा कवडीमोलच? नेमकी कारणे काय?
आठ संवेदनशील मतदान केंद्र
एकतर्फी सर्वाधिक मतदान झालेले व इतर कारणांमुळे मावळ मतदार संघात आठ संवेदनशील केंद्र आहेत. त्यातील तीन पनवेल विधानसभा क्षेत्रातील खारघर, पालिदेवड व शियावली आहेत. मावळ तालुक्यातील वडिवळे गावातील एक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील चार केंद्रांचा समावेश आहे. चिंचवडमधील केंद्रांमध्ये भोईर विरंगुळा केंद्रातील दोन, पिंपळे गुरवमधील एक व थेरगावमधील एका केंद्राचा समावेश आहे.
९० टक्के ओळख मतदार चिठ्ठ्यांचे वाटप
मावळ लोकसभा मतदारसंघातंर्गत येणाऱ्या पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांमध्ये आतापर्यंत ९० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात ओळख मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात आले आहे.
हेही वाचा…प्रचारखर्चाची माहिती लपवल्यामुळे एका उमेदवारावर गुन्हा
मोबाइल नेण्यास प्रतिबंध
मतदानासाठी येणाऱ्या मतदारांकडे ओळख मतदान चिट्टी ( फोटो वोटर स्लीप) असणे अनिविवार्य आहे. मतदाराकडे भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या पुराव्यांपैकी किमान एका पुराव्याची मूळ प्रत असणे आवश्यक आहे. मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात मोबाइल नेण्यास प्रतिबंध असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी सांगितले.