सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीतील पदवीधर गटाच्या दहा जागांसाठी उद्या (२० नोव्हेंबर) मतदान होणार आहे. पुणे, अहमदनगर, नाशिक आणि सिल्वासा येथील एकूण ७१ मतदान केंद्रावर मतदान होणार असून, निवडणूक प्रशासनातील २०० हून अधिक प्राध्यापक, अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून निवडणुकीवर देखरेेख करण्यात येईल. विद्यापीठ निवडणुकीला यंदा पहिल्यांदाच राजकीय स्वरूप आल्याने या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील तरतुदींनुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर पदवीधर गटातून दहा उमेदवार निवडून देण्यासाठी ही निवडणूक होत आहे. अधिसभेवर पुढील पाच वर्षासाठी या प्रतिनिधींची निवड केली जाणार आहे. एक हजार मतदारांमध्ये एक बूथ प्रतिनिधी असे ११४ बूथ असणार आहेत. पाच हजार मतदारांमध्ये एक केंद्र निरीक्षक आहे. प्रत्येक बूथवर एक प्रतिनिधी असेल अशी ७१ मतदान केंद्र असतील. त्यात पुणे शहर येथे २६, पुणे ग्रामीण येथे १०, अहमदनगर १५, नाशिक १९, तर सिल्वासा येथे एक मतदान केंद्र असणार आहे. या ७१ मतदान केंद्रांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा- राहुल गांधी यांच्या निषेधार्थ मनसेकडून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग रोखण्याचा प्रयत्न
पदवीधर मतदार संघातून अधिसभेच्या दहा जागांसाठी एकूण ३७ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असून त्यामध्ये पाच खुल्या जागांसाठी १८ उमेदवार, एका अनुसूचित जाती प्रवर्गासाठी पाच उमेदवार, एका अनुसूचित जमाती प्रवर्गातील जागेसाठी ४ उमेदवार, विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील एका जागेसाठी ४ उमेदवार, इतर मागास प्रवर्गासाठी एका जागेसाठी चार उमेदवार तर महिला प्रवर्ग एका जागेसाठी दोन उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.
हेही वाचा- पुणे: वैद्यकीय महाविद्यालय उभारणीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात
भारतीय जनता पक्षाशी संबंधितांचा विद्यापीठ विकास मंच, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या महाविकास आघाडीचे सावित्रीबाई फुले परिवर्तन पॅनेल, काँग्रेसने पाठिंबा दिलेले छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पॅनेल, हिंदू महासभा यांनी आपापले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. पहिल्यांदाच या निवडणुकीला राजकीय स्वरुप प्राप्त झाल्याने या निवडणुकीला महत्त्व मिळाले आहे.