पुणे : विधानसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रिया बुधवारी शांततेत पार पडली. कार्यकर्त्यांमधील किरकोळ वादाचे प्रकार वगळता शहरात अनुचित घटना घडली नाही. पोलिसांनी शहर, तसेच उपनगरात कडक बंदोबस्त ठेवला होता, अशी माहिती सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली. शहरातील आठ विधानसभा मतदार संघातील मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली होती. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी शहरात पुणे पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह, प्रत्येक विभागाचे पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त, ६०० पोलीस अधिकारी, सहा हजार ८०० पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे एक हजार ७५० जवान, तसेच राज्य राखीव पोलीस दल, केंद्रीय सुरक्षा दलाच्या १७ तुकड्या बंदोबस्तास तैनात करण्यात आल्या होत्या. शहरातील संवेदनशील मतदान केंद्रातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी शहरातील प्रत्येक मतदान केंद्रात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हेही वाचा >>> ‘भाजपला मतदान करा नाही तर बघून घेतो’, सुनील कांबळेंविरुद्ध पोलिसांकडे तक्रार अर्ज

गैरप्रकार, तसेच अनुचित घटना घडल्यास पाच ते दहा मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहचतील, असे नियोजन करण्यात आले होते. शीघ्र कृती दलाच्या तुकड्या संवेदनशील भागात तैनात करण्यात आल्या होत्या. पोलिसांनी योग्य नियोजन केल्याने मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली, अशी माहिती सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली. पुणे पोलीस आयुक्तालयात शिरुर, पुरंदर, खडकवासला मतदार संघाचा काही भागाचा समावेश होतो. उपनगरातील विविध मतदान केंद्रावर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. मतदान केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले होते. मतदान केंद्राच्या परिसरातील दुकाने, व्यावसायिक कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. वाहने लावण्यास मनाई करण्यात आली होती. पोलिसांनी नियोजन केल्याने मतदान शांततेत पार पडले, असे त्यांनी नमूद केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Voting held peacefully no unwanted incident reported in pune district say joint pc ranjan kumar sharma pune print news rbk 25 zws