मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदान करणाऱ्या व्यक्तींना सवलत देण्यासाठी निवडणूक आयोगाच्या परवानगीची आवश्यकता नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांनी गुरुवारी दिली.
लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मतदान केल्याची खूण दाखविल्यावर सवलत देण्यासंदर्भात डॉक्टर आणि डिपार्टमेंट स्टोअर्सने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला असल्याचे सांगून सौरभ राव म्हणाले, शहरातील काही पेट्रोलपंप चालक, ब्रँड ऑफिसेस हेदखील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारांना सवलत देऊ इच्छितात. त्याचप्रमाणे काही टूर ऑपरेटर हेदखील मतदान झाल्यावर त्यांच्या सहलींसाठी ग्राहकांना सवलत देणार आहेत. अशा प्रकारची सवलत देण्यासाठी जर कोणी स्वत:हून पुढाकार घेणार असेल तर त्यासाठी निवडणूक आयोगाच्या परवानगीची आवश्यकता भासणार नाही. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी होणाऱ्या या प्रयत्नांची जिल्हा प्रशासनातर्फे दखल घेण्यात येणार असून निवडणुकीची प्रक्रिया झाल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
संवेदनशील केंद्रांवर नजर
पुणे जिल्ह्य़ामध्ये १०८ मतदान केंद्रे संवेदनशील असून त्यावर जिल्हा प्रशासनातर्फे विविध माध्यमांद्वारे करडी नजर ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांनी सांगितले. पुणे मतदारसंघामध्ये ३६ संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांची तीन टप्प्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यापैकी ८ ठिकाणी मायक्रो ऑब्झरव्‍‌र्हर असतील. १० ठिकाणी वेब कास्टिंग आणि १८ केंद्रांचे व्हिडीओ शूटिंग केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा