पुणे : शारीरिक विकलांग आणि ज्येष्ठ नागरिकांना यंदा टपाली मतदानाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, चिंचवडमध्ये २२१ ज्येष्ठ नागरिक, तर केवळ तीन शारीरिक विकलांग, तसेच कसब्यात ३०२ ज्येष्ठ नागरिक आणि केवळ चार शारीरिक विकलांग नागरिकांनी टपाली मतदानासाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे चिंचवडमध्ये २२ हजार १५, तर कसब्यात २५ हजार ५०८ ज्येष्ठ आणि शारीरिक विकलांग मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रात जाऊन मतदान करण्याचे कळविले आहे.
कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच वयाच्या ८० वर्षांपेक्षा वय असलेल्या मतदारांना प्रत्यक्ष घरून मतदान करण्याची संधी देण्यात आली आहे. आतापर्यंत निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या भेटीमध्ये बहुसंख्य ८० पार केलेल्या मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने मतदारसंघातील १०० टक्के मतदारांना मतदान चिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत चिंचवडमध्ये ६४ हजार आणि कासब्यात ३१ हजार मतदारांना मतदान चिठ्ठी वाटप करण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणी एकूण पाच लाख सात हजार कुटुंबांमध्ये मतदान चिठ्ठी वाटप करायचे आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकांत देशपांडे आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
देशपांडे म्हणाले, की गेल्या निवडणुकीत कसब्यात ५१ टक्के, तर चिंचवडमध्ये ५५ टक्के मतदान झाले होते. यंदा मतदानाची टक्केवारी वाढवण्यावर सर्वाधिक भर दिला जाणार आहे. त्यासाठी आतापर्यंत ४१८ ठिकाणी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले आहेत. चिंचवडमध्ये पाच लाख ६८ हजार ९५४ मतदान केंद्रांची संख्या ५१० आहे. मतदान यंत्रे थेरगाव येथील शंकरराव गावडे कामगार भवन येथे ठेवण्यात आली आहेत. मतमोजणी देखील कामगार भवन येथेच होणार आहे. मतमोजणीसाठी एकूण १६ टेबल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीच्या ३७ फेऱ्या होणार आहेत. मतदानासाठी २०४० कर्मचारी आणि ५१० राखीव कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. ४७ क्षेत्रीय अधिकारी असतील.
कसब्यात दोन लाख ७५ हजार ६७९ मतदार असून मतदान केंद्रांची संख्या २७० आहे. मतदान यंत्रे कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामात ठेवण्यात आली असून मतमोजणी देखील याच ठिकाणी होणार आहे. मतमोजणीसाठी १६ टेबल अशी व्यवस्था केली असून मतमोजणीच्या २० फेऱ्या होणार आहेत. एकूण १८० कर्मचारी नियुक्त केले असून २७० कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. क्षेत्रीय अधिकाऱ्यांची संख्या २५ आहे.