सिद्धहस्त लेखणी आणि तितकाच सिद्धहस्त कुंचला यांच्याशी अद्वैत साधलेले तात्या अर्थात व्यंकटेश माडगूळकर यांना जंगलाचं वेड होतं, पण म्हणून ते माणूसघाणे नव्हते! मुक्या प्राण्यांचं भावविश्व ते जितक्या सखोलपणे जाणायचे तितकच माणसं वाचण्याचं त्यांचं कसबही विलक्षण होतं. अशा या माणूसवेडय़ा अन् अरण्यवेडय़ा लेखकाचं ‘अक्षर’लेणं कायमचं जपलं जाणार आहे.
‘बनगरवाडी’ आणि ‘माणदेशी माणसं’ यांसारख्या अजरामर कलाकृतींच्या लेखकाचे निवासस्थान असलेला ‘अक्षर’ हा टुमदार बंगला आता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्या जागी उभारल्या जात असलेल्या नव्या वास्तूत ‘तात्यां’च्या नित्य वापरातील वस्तूंचे संग्रहालय साकारणार आहे. प्राप्तिकर कार्यालय गल्लीतील हा बंगला १९६१ पासून व्यंकटेश माडगूळकर यांचे निवासस्थान होता. एका लेखकाचे घर कसे असावे हे ध्यानात घेऊन माधव आचवल यांनी त्याची वास्तुरचना केली होती. ज्येष्ठ साहित्यिकांचा सहवास, लेखनाच्या प्रांतामध्ये ‘धुळाक्षरे’ गिरवू पाहणाऱ्या नवोदित लेखकांना तात्यांनी केलेले मार्गदर्शन, व्यंकटेश माडगूळकर-द. मा. मिरासदार आणि शंकर पाटील या तिघांचे एकत्रित कथाकथन, जंगल भटकंती आणि शिकारीचा छंद या साऱ्या घटनांचा हा बंगला गेली पाच दशके साक्षीदार होता. पंडित-जावेडकर बिल्डर्स नवी वास्तू विकसित करीत आहेत, अशी माहिती माडगूळकर यांच्या कन्या ज्ञानदा नाईक यांनी दिली. त्या म्हणाल्या, या वास्तूत तात्यांची स्मृती जतन व्हावी या आमच्या इच्छेला सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे येथे छोटेखानी संग्रहालय साकारले जाणार आहे. तात्यांची स्टडी रूा, त्यांच्या स्वत:च्या ग्रंथालयातील इंग्रजी साहित्याची अभिजात पुस्तके, तात्यांनी लेखन केलेली पुस्तके, त्यांचा सूट, चष्मा, गॉगल, पाइप, पेन, फिरायला जाताना ते बरोबर घ्यायचे ती काठी यांसह त्यांच्या लेखनाच्या वह्य़ा, टिपण वह्य़ा, तात्यांनी चितारलेली चित्रे, स्केच बुक्स अशा गोष्टी पाहावयास मिळणार आहेत. तात्यांचा छायाचित्रांचा संग्रह, त्यांच्या पुस्तकांसाठी ज्येष्ठ चित्रकार दीनानाथ दलाल यांनी चितारलेली जुनी मुखपृष्ठे, तात्यांनी रेखाटलेली वन्यजीवांची चित्रे याचाही या संग्रहालयामध्ये समावेश असेल. अशा पद्धतीने ज्येष्ठ साहित्यिकाच्या खुणांचे जतन करण्याच्या या प्रस्तावाला पंडित-जावडेकर यांनी सहमती दर्शविली आहे. आगामी दोन वर्षांत हे संग्रहालय साकारणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा