खवय्यांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळालेला वडापाव हातगाडीपासून थेट पंचतारांकित हॉटेलांच्या चकचकीत टेबलांवर पोहोचला.. अतिसामान्यांपासून उच्चभ्रूंच्या जिभेवर त्याची चव रेंगाळली.. केवळ वडापावच्या विक्रीसाठी साखळी पद्धतीची दुकाने सुरू झाली.. दोन-तीन रुपये दरापासून सुरू झालेला वडापावचा प्रवास पंधरा ते वीस रुपयांपर्यंत पोहोचला.. महागाईबरोबर त्याचे दरही वाढले, पण दहा वर्षांपूर्वीच्या दरामध्ये आजही शहरात विविध ठिकाणी वडापाव उपलब्ध करून देण्याचा फंडा काही विक्रेत्यांनी अवलंबला असून, ‘वडापाव पाच रुपये’, असे फलक पहायला मिळत आहेत.
वडा व पावची ही भन्नाट जोडी कुणी जुळविली व हा पदार्थ नेमका कुणी शोधला, याचे उत्तर कुणाकडेही नाही. मात्र, वडापावची लज्जत कशी असते, याचे उत्तर जवळजवळ सर्वाकडे असते. सर्वात लोकप्रिय ठरलेले हे अस्सल मराठमोळी ‘फास्ट फूड’ लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वानाच जवळचे वाटते. त्यामुळे हातगाडी किंवा छोटय़ा टपऱ्यांवर मिळणारा वडापाव कधी मोठमोठय़ा हॉटेलांत पोहोचला, हे कळलेच नाही. अगदी ब्रॅन्डेड वडापावही बाजारात आला. त्याचबरोबर ‘आमची कुठेही शाखा नाही’, असे म्हणत काहींनी स्वत:ची एक वेगळी चव जपत केवळ वडापाव या एकाच पदार्थावर मोठा व्यवसाय उभारला.
 वडापाव मिळत नाही, असा एकही भाग शहरात सापडणार नाही. काही जण सांगतात की, आमच्यावेळी दीड ते दोन रुपयांना वडापाव मिळत होता. पण, पुढे हा वडापाव अनेक दिवस चार ते पाच रुपयांपर्यंत स्थिरावला. अगदी दहा वर्षांपूर्वीपर्यंत वडापाव पाच रुपयांनाच होता. त्यानंतर तेल, बटाटा, बेसन, इंधन आदींच्या दरात होणारी वाढ लक्षात घेता सरासरी दहा रुपयांपर्यंत वडापावची किंमत झाली. काही ठिकाणी १५ ते २० रुपयांपर्यंतही त्याची किंमत गेली. पण, आता पुन्हा वडापाव दहा वर्षांपूर्वीची किंमत धारण करतो आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात त्याचप्रमाणे उपनगरांमध्ये विविध ठिकाणी ‘वडापाव पाच रुपये’ अशा पाटय़ा झळकत आहेत. त्यामुळे संबंधित ठिकाणी खवय्यांची गर्दीही पहावयास मिळत आहे. वडापाव विक्रेत्यांमधील स्पर्धेमुळे दर कमी करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.
वडापाव पाच रुपयांत होतो?
वडापाव तयार करण्यासाठी लागणाऱ्या पदार्थाची किंमत लक्षात घेता, वडापाव पाच रुपयांत विकणे शक्य नाही, असे काही विक्रेत्यांचे म्हणणे आहे. पाच रुपयांचा वडापाव करताना साहित्याबाबत काहीतरी तडजोडी केल्या जातात, असे या विक्रेत्यांचे म्हणणे आहे. सध्या तेल ६० ते ६२ रुपये लिटर, बेसन ४० ते ४५ रुपये किलो, तर बटाटा १० ते १२ रुपये किलो या दराने मिळतो. इंधनाच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. मात्र, ही स्थिती असतानाही वडापाव पाच रुपयांत विकणे शक्य आहे, असे काही विक्रेत्यांचे म्हणणे आहे. चवीत कोणतीही तडजोड न करता साहित्याचा योग्य वापर व वडय़ाचा आकार किंचित कमी करून वडापाव पाच रुपयांना विकणे शक्य आहे, असेही म्हणणे काहींनी मांडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा