सकाळपासून जाणवणारा उकाडा, दुपारच्या वेळी तर घामाच्या धारा, आकाशात ढगांची गर्दी आणि कधी वादळी पावसाचा तडाखा.. उन्हाळय़ाचे वैशिष्टय़ असलेले हे वातावरण सध्या पुण्यात अवतरले असून, ऐन पावसाळय़ात त्याचा अनुभव घ्यावा लागत आहे. विशेष म्हणजे, गणपतीच्या आगमनापर्यंत तरी मोसमी पाऊस सक्रिय होण्याची चिन्हे नसल्याने पुणेकरांना असेच वातावरण अनुभवण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.
शहरातील वातावरणात आठवडय़ाभरापासून बदल झाला आहे. पावसाचा जोर संपून कोरडे वातावरण निर्माण झाले आहे. आठवडय़ापूर्वी पुण्यात सलग काही आठवडे पावसाची संततधार कायम होती. त्यामुळे उघडीप कधी मिळणार याची प्रतीक्षा केली जात होती. आता त्यात पूर्णपणे बदल झाला आहे. उन्हाळय़ात असते त्याप्रमाणे दिवसा उकाडा जाणवत आहे. ऑगस्टच्या मध्यावर पुण्याचे कमाल तापमान साधारणत: २७-२८ अंशांच्या आसपास असते. गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मंगळवारी कमाल तापमान ३२.६ अंश सेल्सिअस होते, तर बुधवारी ते ३२.९ अंशांवर पोहोचले होते. त्यामुळे ते सरासरीच्या तुलनेत पाच ते सहा अंशांनी जास्त नोंदवले जात आहे. कमाल आणि किमान तापमानातील फरकही सुमारे १० अंशांपर्यंत वाढला आहे.
मान्सूनच्या काळाचे वैशिष्टय़ असलेला संततधार पाऊस सध्या अनुभवायला मिळत नाही. याउलट थोडय़ा वेळाच जास्त पाऊस असे वैशिष्टय़ असलेला वादळी पाऊस हजेरी लावत आहे. मंगळवारी दुपारीसुद्धा पुण्यात अशाच पावसाने हजेरी लावली. दुपारी दोन-तीनच्या सुमारास अध्र्या-पाऊण तासाच्या काळात तब्बल २३ मिलिमीटर पाऊस पडला. मात्र, त्याच वेळी लोहगाव येथे केवळ ८ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला. हा तासाभराचा काळ वगळता दिवसभर लख्ख ऊन होते. असेच वातावरण बुधवारी दुपापर्यंत अनुभवायला मिळाले. मात्र, आकाशात ढग दाटल्यानंतरही सायंकाळपर्यंत पाऊस पडलाच नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा