पिंपरी पालिकेच्या बहुचर्चित आणि बहुखर्चिक प्रकल्पांच्या उद्घाटनांसाठी ‘माननीय’ पाहुण्यांची वेळ जुळून येत नसल्याने पालिका प्रशासनासह नागरिकांना आणखी ‘प्रतीक्षा’ करावी लागणार आहे. नाशिकफाटा व काळेवाडी उड्डाणपुलासाठी १५ फेब्रुवारीची तारीख मिळण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली.
लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेब्रुवारीअखेर सर्व कार्यक्रम उरकून घ्या, अशा सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. त्यानुसार, उद्घाटनांच्या कार्यक्रमाची यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. उद्घाटनांसाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. तथापि, त्यांच्या वेळा जुळून येत नसल्याने कोणतीही तारीख निश्चित होत नसल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. जवळपास १३० कोटी रूपये खर्च करून उभारलेला नाशिकफाटा येथील दुमजली उड्डाणपुलाला भारतरत्न जेआरडी टाटा यांचे नाव देण्यात आले आहे. किरकोळ काम वगळता हा उड्डाणपूल उद्घाटनासाठी सज्ज आहे. त्याचप्रमाणे, पिंपरी प्राधिकरणाच्या वतीने तयार केलेला काळेवाडीचा दुहेरी उड्डाणपूलही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.
या दोन्ही पुलांच्या उद्घाटनांसाठी शरद पवार यांनी १५ फेब्रुवारीची वेळ दिल्याचे सांगण्यात येते. तथापि, अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे. मात्र, त्यांची वेळ जुळून येत नसल्याने अंतिम तारीख निश्चित होऊ शकलेली नाही. उड्डाणपुलाशिवाय, स्वस्तात घर देण्याच्या ‘घरकुल’ योजनेतील दुसऱ्या टप्प्यातील जवळपास २२०० घरांचे वाटप होणार असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे. विठ्ठलनगर, अजंठानगर, वेताळनगर येथील पुनर्वसन प्रकल्पातील घरांच्या वाटपाचे नियोजन आहे. प्रभागनिहाय नागरी सुविधा केंद्र सुरू करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यातील पाच केंद्रांचे उद्घाटन होणार आहे. बीआरटीएस मार्ग तयार आहे. त्याचे उद्घाटन प्रतीक्षेत आहे. याशिवाय, अन्य छोटे-मोठे प्रकल्प आहेत. या सर्वाना उद्घाटनाची प्रतीक्षा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Waiting for flyover bridgesgharkul etc