रंगभूमीला चालना मिळावी, कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी शहरात नाटय़संकुल उभारण्याची कल्पना नाटय़ परिषदेने १५ वर्षांपूर्वी मांडली. तेव्हापासून केवळ ‘कागदी घोडे’ नाचवले गेले. सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांकडे वारंवार दाद मागूनही या कामाला चालना मिळाली नाही. त्यामुळे परिषदेचे शहराध्यक्ष व काँग्रेसमधून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत असलेले भाऊसाहेब भोईर यांनी आता केंद्रात व राज्यात सत्ता असलेल्या भाजप नेत्यांना साकडे घातले आहे.
नाटय़ परिषदेच्या वर्धापनदिनासाठी भोईरांनी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांना आमंत्रितकरून राजकीय वर्तुळात चर्चा घडवून आणली. रखडलेला नाटय़संकुलाचा विषय मांडून शहरवासियांचे स्वप्न पूर्ण करा, असे साकडे त्यांना घातले. अभिनेते रवींद्र घागुंर्डे, स्मिता तांबे यांनीही त्यांच्या सूरात सूर मिसळला. खासदार अमर साबळे यांनी मदतीचे आश्वासन दिले. त्यानंतर, संकुलासाठी शब्द टाकू, अशी ग्वाही जाजू यांनीही दिली. भोईरांनी आपले ‘दुखणे’ भाजप नेत्यांपुढे व्यक्त केले. राष्ट्रीय पक्षात काम करणे अवघड आहे, राजकारणात मी फार सोसले, आयुष्यभर विघ्ने आली, भाजप नेत्यांना कार्यक्रमाला बोलावल्याने तर्कवितर्क लढवले गेले, असे मुद्दे त्यांनी मांडले. इतकी वर्षे सत्ता असतानाही संकुल झाले नाही, हे दुर्दैव होते. दिल्लीतून सूत्र हलवा, हीच तुमच्याकडून अपेक्षा असल्याचे भोईरांनी जाजू यांना सांगितले.
भोईर काँग्रेसचे नगरसेवक तसेच नाटय़परिषदेचे सहकार्यवाह आहेत. प्राधिकरणाची २० गुंठे जागा संकुलासाठी मिळावी, यासाठी त्यांनी बराच पाठपुरावा केला, मात्र, काँग्रेसची सत्ता असताना व जवळची मंडळी पदावर असूनही उपयोग झाला नाही. पाच वर्षांपूर्वी नाटय़ परिषदेच्या कार्यक्रमासाठी आलेल्या अजितदादांनी १५ दिवसात भूमिपूजन होईल, असे ठणकावून सांगितले. तसे काहीच झाले नाही. जागेचे पैसे देण्यास परिषदेची तयारी असताना विविध अडचणींचा पाढा सांगितला जातो. शैक्षणिक संस्थांना, बिल्डरांना थेटपध्दतीने भूखंड दिले जातात. मात्र, नाटय़संकुलासाठी अडवणूक केली जाते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

Story img Loader