पुण्यात जागा विकत घेण्यासाठी सर्वाधिक लोक वाकडचाच विचार करीत असल्याचे एका पाहणीत दिसून आले आहे. ‘९९ एकर्स’ या संकेतस्थळाने केलेल्या पाहणीत २०१२ साली वाकड हा पुण्यात जागा खरेदीसाठी संकेतस्थळावर सर्वात जास्त शोधला गेलेला भाग ठरला आहे. तर कोथरूडचा जागा भाडय़ाने घेण्यासाठी सर्वाधिक शोध केला गेल्याचे समोर आले आहे.
संकेतस्थळातर्फे पुणे, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता या शहरांमध्ये अशा प्रकारची पाहणी करण्यात आली होती. या पाहणीनुसार संकेतस्थळाने पुण्यातील जागाखरेदीसाठी तसेच जागा भाडय़ाने घेण्यासाठी शोधल्या गेलेल्या पहिल्या वीस ठिकाणांची यादीच प्रसिद्ध केली आहे.
जागाखरेदीच्या बाबतीत वाकडच्या खालोखाल बाणेरचा आणि त्यानंतर कोथरूडचा क्रमांक लागला आहे. तर बालेवाडी आणि कोंढवा जागाखरेदीसाठी सर्वात कमी लोकप्रिय असल्याचे दिसून आले आहे. जागा भाडय़ाने घेण्यासाठी कोथरूडनंतर औंधने दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर बाणेर जागा भाडय़ाने घेण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावर आहे. बावधन या यादीत सर्वात शेवटच्या म्हणजे विसाव्या क्रमांकावर आहे.
‘तरुण आणि आर्थिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण नागरिक मोठय़ा आकाराच्या घरांच्या शोधात असल्याचे चित्र असून अशा प्रकारच्या घरांमधील गुंतवणुकीसाठी वाकड लोकप्रिय होत आहे. या भागांतील रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर नागरी सुविधांचा विकास या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे’, असे संकेतस्थळाने म्हटले आहे.

Story img Loader