पुणे, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, बारामती येथून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून २१ लाख ५० हजारांच्या एकूण ४३ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. मुख्य सूत्रधार केशव महादेव पडोळे, नितीन राजेंद्र शिंदे, नवनाथ सुरेश मुटकुळे, ऋषीकेश भोपळे, अमोल दगडू पडोळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी चोरी केलेल्या दुचाकी कमी किमतीत विकायचे.

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वाकड पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यांचा पर्दाफाश केला आहे. शहरात दुचाकी चोरण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. वाकड पोलिसांच्या हाती दुचाकी चोर नितीन राजेंद्र शिंदे लागला. त्याला अटक करून त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर मुख्य सूत्रधार केशव महादेव पडोळे याचे नाव पुढे आले. दुचाकी चोरी करण्यासाठी त्यांची एक टोळी असल्याची माहिती समोर आली. त्यांनादेखील विविध ठिकाणांहून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १४, हिंजवडी येथील ०४, बारामती तालुक्यातील ०७, रांजणगाव येथील ०३, अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर अशा विविध शहरांतून चोरी केलेल्या एकूण ४३ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा – खातरजमा न करता माध्यमांकडून बदनामी; संपर्क होत नसल्याच्या वृत्तावरून अजित पवार यांची खंत

हेही वाचा – गोष्ट पुण्याची: भाग ७५- शंभर वर्षांपासून दिमाखात उभा असलेला छत्रपती शिवाजी महाराज पूल

चोरीच्या दुचाकी कमी किंमतीत घेणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल

दरम्यान, कमी किमतीत दुचाकी मिळते म्हणून चोरीच्या दुचाकी घेणाऱ्या १७ जणांवर वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नागरिकांनी चोरीच्या दुचाकी विकत घेऊ नयेत. गाडीचे सर्व कागदपत्रे असतील तरच दुचाकी घ्यावी अन्यथा अशा प्रकारे गुन्हे दाखल होऊ शकतात, अशी माहिती पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी दिली आहे. संबंधित कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने, गुन्हे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या पथकाने केली.

Story img Loader