पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवडमधील वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गहाळ आणि चोरीला गेलेले १२० मोबाईल मूळ मालकांना पोलिसांनी परत केले आहेत. बहुतांश चोरीला गेलेले मोबाईल हे परराज्यात ऍक्टिव्ह होते. १२० मोबाईल पैकी काही मोबाईल हे ज्या व्यक्तींना विकले गेले त्यांच्याशी संपर्क साधून कायद्याचा धाक दाखवून परत आणण्यात पोलिसांना यश आल आहे.
मोबाईल हे अत्यंत महत्त्वाचं साधन झालं आहे. मोबाईल हा सतत आपल्या सोबत असतो. अनेकदा हा मोबाईल गहाळ होतो. चोरीला गेल्यानंतर मोबाईल मिळाला तर आपलं नशीबच. अशीच काहीशी कामगिरी वाकड पोलिसांनी केली आहे. चोरीला आणि गहाळ झालेले १२० मोबाईल ट्रेस करून त्या व्यक्तीशी संपर्क साधून कायद्याचा धाक दाखवून मोबाईल परत मिळवले आहेत. असे एकूण २० लाख रुपयांचे १२० मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले असून त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहेत.
आणखी वाचा-गुटखा वाहतूक करणारा टेम्पो पकडला, १८ लाखांचा मुद्देमाल जप्त
बिहार, कर्नाटक, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये चोरीला आणि गहाळ झालेले मोबाईल पोलिसांना ट्रेस झाले. पोलिसांनी तांत्रिक तपास करून चोरी झालेल्या मोबाईल पर्यंत पोहोचले. गहाळ किंवा चोरीला गेलेला मोबाईल मिळणं हे खरं तर आमचं नशीब आहे. असं म्हणत मोबाईल मालकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर त्यांनी मोबाईल चोरीला जाणार नाही. याची दक्षता नागरिकांनी घ्यावी असं आवाहन देखील त्यांनी केल आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या टीम ने केली आहे.