हृदयविकाराचे निदान वेळीच व्हावे यासाठी रक्तदाबाची तपासणी करणे, जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवण्यासाठी सल्ला देणे आणि वैद्यकीय चाचण्यांची माहिती देणे ही कामे परिचर्या शाखेच्या विद्यार्थिनी यशस्वीपणे करत आहेत. या विद्यार्थिनींनी आपल्या अध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली गरीब वस्तीत मोफत ‘वॉक इन क्लिनिक’ सुरू केले आहे.
भारती विद्यापीठ नर्सिग कॉलेजतर्फे ऑगस्ट महिन्यापासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. मार्केट यार्डजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीतील अंगणवाडीत पंधरा दिवसातून एकदा शनिवारी सकाळी १० ते १ या वेळात हे क्लिनिक चालवले जाते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनतर्फे या वर्षीच्या आरोग्य दिनासाठी उच्च रक्तदाब हा विषय निवडण्यात आला होता. या पाश्र्वभूमीवर या उपक्रमात हृदयविकारांचे निदान लवकर होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांच्या रक्तदाब तपासणीबरोबरच हृदयाचे ठोके, वजन आणि उंचीचे गुणोत्तर (बॉडी मास इंडेक्स), आधीच्या आजाराचा इतिहास ही माहिती नोंदवून घेतली जाते. रोजच्या जेवणात हृदयाच्या आरोग्यासाठी काय बदल करावेत, ताणतणावाचे नियंत्रण कसे करावे याविषयी माहिती दिली जाते, तसेच गरज असल्यास रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो.
नागरिक केवळ रक्तदाबाच्या तपासणीसाठीच नव्हे तर आरोग्यासंबंधीच्या वैयक्तिक प्रश्नांचे निरसन करून घेण्यासही येत असल्याचे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्नेहा पित्रे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘परिचारिकांना रुग्णाला औषधे सुचवण्याची परवानगी नसते परंतु त्या रुग्णाला मार्गदर्शन करू शकतात. डॉक्टरांना व्यस्ततेमुळे प्रत्येक रुग्णाला खूप वेळ देणे शक्य होत नाही. परंतु रुग्ण परिचारिकांशी मोकळेपणे बोलतात. आपल्याला कोणत्या आजाराची शक्यता आहे, किंवा काही चाचण्या करून घेण्याची गरज आहे का, हे रुग्णांना वेळीच कळले तर रोगाचे निदान लवकर होण्यास मदत होते.’’
परिचारिका चालवताहेत ‘वॉक इन क्लिनिक’! –
हृदयविकाराचे निदान व्हावे यासाठी रक्तदाबाची तपासणी करणे, जीवनशैलीत सकारात्मक बदलासाठी सल्ला,वैद्यकीय चाचण्यांची माहिती देणे ही कामे परिचर्या शाखेच्या विद्यार्थिनी यशस्वीपणे करत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-10-2013 at 02:35 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Walk in clinic project by nurses in bharati vidyapeeth