‘राज्यमंडळाच्या पुढच्या टप्प्यापर्यंत विनोदजी पुढे जाऊ देत आणि मला शिक्षणमंत्रीपद मिळू दे.,’ अशी आमदार विक्रम काळे यांची टिप्पणी आणि त्यावर ‘आम्ही पुढे जाऊ, पण शिक्षणमंत्री पद मिळायला विक्रम काळे पक्ष बदलून भाजपात येणार का?’ असा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केलेला सवाल, अशा राजकीय टोलेबाजीने राज्यमंडळाच्या सुवर्णमहोत्सवाच्या उद्धाटन सोहळ्याचे व्यासपीठ गुरूवारी गाजले.
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यात राजकीय जुगलबंदी गुरूवारी रंगली. संघटनांच्या आणि संस्थाचालकांच्या बाजूने बोलताना काळे यांनी तावडे यांना राजकीय चिमटेही घेतले. तावडे यांनीही त्यांच्या फटकेबाजीला उत्तरे दिली. ‘तावडे यांच्यासारखे सर्वाचे एकून घेणारे मंत्री शिक्षणखात्याला मिळाले. मात्र, मी आता अजिबात वेतनवाढीचे काहीही बोलणार नाही. मात्र, नवे वर्ष सर्वासाठी डीएवाढीचे जावो. राज्यमंडळाचा अमृत महोत्सवही असाच दिमाखात साजरा होवो. त्या वेळी तावडेजी आणखी पुढे गेलेले असूदेत आणि शिक्षणमंत्रीपद माझ्याकडे असावे,’ अशी टिपण्णी काळे यांनी केली.
‘‘काळे यांचे ‘कहीं पे निगाहे, और कहीं पे निशाना.’ असे असते. शिक्षणमंत्री होण्याची इच्छा व्यक्त करत, काळे यांना भाजपात प्रवेश करत असल्याचे सुचवायचे असावे. कारण पुढची पन्नास वर्षे भाजपाचेच सरकार असेल, त्यामुळे शिक्षणमंत्री होण्यासाठी त्यांना भाजपात यावे लागेल,’’ असे उत्तर तावडे यांनी दिले. ‘‘तुमच्या मंत्र्यांसारखी नव्या वर्षांची सुरूवात आम्ही मॉरिशस किंवा दुबईला करत नाही. त्यामुळे राज्यातील शिक्षण विभागाच्या कामाची काळजी करू नका,’’ असा टोला तावडे यांनी हाणला. ‘‘आमच्या मंत्रिमंडळात कुणीही संस्थाचालक नाही. जमत असेल, तर शिक्षणमहर्षी व्हा, सम्राटच व्हायचं असेल, तर शिक्षण सम्राट नको, उद्योग सम्राट व्हा. राज्यातल्या संस्थाचालकांनाही आता वठणीवर आणणार आहे,’’ असेही तावडे म्हणाले.