लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : ‘मराठी मातृभाषा आहे. मातृभाषेबद्दल आपुलकी, जिव्हाळा असला पाहिजे. ती टिकली पाहिजे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. महाराष्ट्रात राहायचे असेल, तर मराठी आलीच पाहिजे,’ असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

‘देशात अनेक राज्यांमध्ये हिंदी भाषा बोलली जाते. हिंदी राष्ट्रभाषा आहे, की नाही, त्यावर वाद सुरू आहे. त्यात मला जायचे नाही. ज्याला काही उद्योग नाही, ते असले वाद घालतात. त्यातच ते वेळ घालवत आहेत,’ असे सांगून पवार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली.

बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केलेल्या विविध दाव्यांबाबत पवार म्हणाले, ‘कोणी आरोप केले, तर त्याची चौकशी केली जाईल. निलंबित केलेली व्यक्ती काही बोलत असेल, तर त्याला जास्त महत्त्व देण्याचे कारण नाही. अशा व्यक्तीच्या वक्तव्याला किती महत्त्व द्यायचे, याचाही विचार जनतेने करावा.’

चापेकर बंधूंच्या स्मारकाच्या कामाला विलंब

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या स्मारकाच्या कामाला विलंब झाला, हे मान्य आहे. आता राज्य शासनाने लक्ष घातले आहे. इतिहासाला साजेसे असे चापेकर बंधूंचे स्मारक होईल. राज्य सरकारचा कार्यकाळ संपण्याच्या आतमध्ये स्मारकाचे काम पूर्ण केले जाणार आहे. स्मारकाच्या कामाला निधीची कमतरता भासणार नाही. राज्य सरकारचा ६० टक्के निधी, तर महापालिकेचा ४० टक्के हिस्सा मिळून या स्मारकाचे काम पूर्ण केले जाणार आहे.’

‘क्रांतिवीर दामोदर चापेकर, बाळकृष्ण चापेकर आणि वासुदेव चापेकर ही केवळ तीन नावे नाहीत, तर स्वातंत्र्यासाठी तळमळ, अन्यायाच्या विरोधात एल्गार आणि मातृभूमीसाठी प्राणार्पणाची प्रेरणा आहेत. रँडचा वध ही केवळ एक क्रांतिकारी कृती नव्हती, तर जनजागृतीची एक ठिणगी होती. देशाभिमानाचा एक हुंकार होता. या धाडसी कृतीतून चापेकर बंधूंनी इंग्रज सत्तेला दाखवून दिले, की भारतीयांचा संयम चिरडता येत नाही. त्यांच्या बलिदानामुळे नव्या पिढीला स्वातंत्र्याची प्रेरणा मिळाली. पुणे केवळ विद्येचे सांस्कृतिक केंद्र नाही, तर स्वातंत्र्याच्या धगधगत्या आंदोलनाचे एक केंद्र राहिले आहे,’ असेही पवार म्हणाले.