सुरक्षेबरोबरच ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्याच्या दृष्टीने पोलीस ठाण्याच्या पातळीवर ज्येष्ठ नागरिकांच्या समित्या स्थापन झाल्यानंतर पोलीस आयुक्तांच्या स्तरावरील ज्येष्ठ नागरिकांच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत ज्येष्ठांनी सुरक्षेबरोबरच वाहतुकीच्या विविध समस्या मांडल्या. ज्येष्ठ नागरिकांना बस थांब्यावर स्वतंत्र रांग हवी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
केंद्र शासनाने दिलेल्या सूचनेनुसार प्रत्येक पोलीस ठाण्याच्या पातळीवर ज्येष्ठ नागरिकांच्या समित्या स्थापन झाल्या आहेत. या समितीची आठवडय़ातून एकदा बैठक होणार आहे. त्याचप्रमाणे सहायक पोलीस आयुक्तांच्या पातळीवरही समित्या स्थापण्यात आल्या आहेत. या समितीची महिन्यातून एक बैठक होणे अपेक्षित आहे. या समित्यांच्या स्थापनेनंतर आता पोलीस आयुक्तांच्या स्तरावरील समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये ज्येष्ठ नागरिक संघांच्या पाच प्रतिनिधींसह, गुन्हे व वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या समितीची बैठक गुरुवारी पोलीस आयुक्तालयात झाली. त्या वेळी शंभरहून अधिक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्या समोर ज्येष्ठांनी त्यांच्या विविध अडचणी मांडल्या. या मुख्य समितीची दोन महिन्यातून एकदा बैठक होणार आहे, अशी माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी दिली.
बैठकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी वाहतुकीसंदर्भात विविध तक्रारी केल्या. झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता ओलांडता येत नसल्याबाबत त्याचप्रमाणे शहरात अनेक ठिकाणी गतिरोधक मानकांनुसार नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांची बस थांब्यावरील रांगेत गैससोय होते. त्यामुळे थांब्यांवर ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रांग असावी, अशी मागणीही करण्यात आली. या मागणीचा आढावा घेऊन पीएमपीला त्याबाबत कळविण्यात येईल, असे आश्वासन बैठकीत देण्यात आले. शहरातील काही बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना पैसे घरपोच आणून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्येष्ठांनी आपापल्या बँकेत याबाबत चौकशी करून या योजनेचता लाभ घ्यावा, असे आवाहनही बैठकीत करण्यात आले.
बसथांब्यावर ज्येष्ठ नागरिकांना हवी स्वतंत्र रांग!
सुरक्षेबरोबरच ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्याच्या दृष्टीने पोलीस ठाण्याच्या पातळीवर ज्येष्ठ नागरिकांच्या समित्या स्थापन झाल्यानंतर पोलीस आयुक्तांच्या स्तरावरील ज्येष्ठ नागरिकांच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे.
First published on: 18-10-2013 at 02:34 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Want to special queue to senior citizen on bus stop