पुणे : शिरूरचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आढळराव यांच्यात शाब्दिक युद्धाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि आढळराव यांनी कोल्हेंवर जाहीर टीका केल्यानंतर कोल्हे यांनीही त्यांच्यावर जोरदार हल्ला चढविला आहे.
हेही वाचा >>> सातारा, नाशिक, माढा मतदारसंघांबाबत अजित पवार यांची सावध भूमिका, पुण्यात पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक
शिरूरचे खासदार संवादफेक करण्यात वस्ताद आहेत. चित्रपट, मालिकांमध्ये काम करण्यापेक्षा जनतेमध्ये जाऊन घाम गाळणे अवघड आहे. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि त्यांच्या हाकेला धावून जाणारा माणूस खासदार म्हणून निवडून द्यावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली, असे कोल्हे सांगतात; पण त्यांनी नथुराम गोडसेचीही भूमिका केली होती. काँग्रेसचे लोक त्यांना मतदान करतील का, अशी विचारणा पवार यांनी केली. तर बेडूकउडी अशी टीका करणाऱ्या माझ्या मित्राने मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी असा प्रवास केला आहे, असा टोला त्यांनी कोल्हे यांना लगावला. पवार आणि आढळराव यांनी केलेल्या टीकेनंतर या दोघांवर डॉ. कोल्हे यांनी जोरदार हल्ला चढविला. शिरूर लोकसभा मतदार संघात माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या विरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार मिळाला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उमेदवार आयात करावा लागला, हा शरद पवार यांचा विजय आहे. एकेकाळी अजित पवार यांच्यावर टीका केलेल्या शिवाजीराव आढळराव यांना एका मंगल कार्यालयात छोटेखानी कार्यक्रमात प्रवेश द्यावा लागला, याबद्दल आश्चर्य वाटते. माझे काका डॉक्टर म्हणून मी डॉक्टर झालो नाही. काका अभिनेता म्हणून मी अभिनेता झालो नाही. डॉक्टर, अभिनेता आणि नंतर खासदार होण्यात माझे कष्ट आहेत. शेतकऱ्यांच्या आणि मध्यमवर्गीयांच्या मुलांनी राजकारणात यायचे नाही का,’ असा सवाल कोल्हे यांनी अजित पवार यांना उद्देशून केला आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात सध्या शाब्दिक युद्ध रंगल्याचे दिसून येत आहे.