सब से बडा खिलाडी सुरेशभाई कलमाडी, सुरेश कलमाडी झिंदाबाद अशा घोषणांनी गुरुवारी कलमाडी समर्थकांनी लोहगाव विमातळ दणाणून टाकला. कलमाडी यांचे दिल्लीतून दुपारी साडेचारच्या सुमारास लोहगाव येथे आगमन झाले. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी त्यांचे जोरदार घोषणा देत स्वागत केले. या स्वागतानंतर त्यांची उघडय़ा जीपमधून मिरवणूकही काढण्यात आली. निवडणूक लढवण्याबाबत शुक्रवारी (२१ मार्च) कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.
पुण्यातून उमेदवारी मिळण्यासाठी कलमाडी गेल्या आठवडय़ापर्यंत प्रयत्नशील होते. त्यानंतर त्यांनी पत्नी मीरा यांना उमेदवारी मिळावी असेही प्रयत्न केले. मात्र, हायकमांडकडून दोघांनाही उमेदवारी नाकारण्यात आली. त्यानंतर विश्वजित कदम यांची पुण्यातील उमेदवार म्हणून घोषणा झाली. या घोषणेमुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता असून कलमाडी गटाने अतिशय सावध पवित्रा घेत तूर्त मौन बाळगले आहे. कलमाडी दिल्लीतून पुण्यात येणार असल्याचा निरोप मिळाल्यानंतर त्यांचे समर्थक दुपारी मोठय़ा संख्यने लोहगाव विमानतळावर जमले होते.
कलमाडी यांचे आगमन झाल्यानंतर आमदार रमेश बागवे, उपमहापौर बंडू गायकवाड तसेच अनेक नगरसेवक, पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. जोरदार घोषणांमुळे यावेळी उत्साही वातावरण तयार झाले होते. कलमाडी यांचे आगमन होताच सब से बडा खिलाडी सुरेशभाई कलमाडी ही घोषणा हमखास दिली जाते. तीच घोषणा गुरुवारी देखील दिली जात होती. कलमाडी यांची महापालिकेत सत्ता असताना विमानतळावर त्यांचे स्वागत ज्या पद्धतीने होत असे त्याच पद्धतीचे स्वागत गुरुवारी झाले. पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत झाल्यानंतर कलमाडी यांनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.
निवडणूक लढण्याबाबत आज चर्चा
पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवणार का, असा प्रश्न विचारला असता कलमाडी म्हणाले की, मी अद्याप त्याबाबत निर्णय घेतलेला नाही. त्याबाबत मी शुक्रवारी कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. सर्वाना दुपारी घरी बोलावले आहे. त्यांच्याबरोबर चर्चा करून बैठकीत जे ठरेल त्यानुसार मी माझा निर्णय जाहीर करीन. कलमाडी अद्यापही निवडणूक लढवण्यास उत्सूक असल्याचे संकेत मिळाल्यामुळे काँग्रेसमध्ये त्यांच्या भूमिकेबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली असून ते शुक्रवारी काय निर्णय जाहीर करतात याबाबत आता तर्कवितर्क मांडले जात आहेत.