‘थर्ड पार्टी’ विम्यामध्ये प्रस्तावित असलेली मोठी वाढ व वाहतूकदारांच्या इतर प्रश्नांबाबत शासनाशी चर्चा करूनही तोडगा न निघाल्याने देशभरातील वाहतूकदारांनी एक एप्रिलपासून बेमुदत बंद पुकारण्याचा इशारा दिला आहे. ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेसचे बाबा शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली.
विमा कंपन्यांकडून सर्वच प्रकारच्या वाहनांच्या ‘थर्ड पार्टी’ विम्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ करण्यात येणार आहे. ट्रकसाठी या विम्याची रक्कम १५ ते २५ हजारावरून ३० ते ४० हजार रुपये होणार आहे. या मोठय़ा प्रमाणावरील वाढीला संघटनेने विरोध केला आहे. या संदर्भात शासनाशी चर्चा करून कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे शिंदे यांनी सांगितले. विम्याच्या प्रश्नाबरोबरच डिझेलवरील शासनाने नियंत्रण काढून घेतल्याने वेळोवेळी डिझेलच्या किमती वाढत आहेत. त्या प्रमाणात भाडय़ामध्ये वाढ मात्र मिळत नाही. त्यामुळे किमान सहा महिन्यासाठी डिझेलचे दर स्थिर ठेवावेत, अशी मागणीही संघटनेने केली आहे.
टोल नाक्यांवर वाया जाणाऱ्या वेळेमुळे होणाऱ्या नुकसानीकडेही संघटनेने लक्ष वेधले आहे. अनेक टोलनाक्यांवर योग्य व्यवस्था नसल्याने वेळ व इंधनही वाया जाते. त्याबाबत उपाययोजना व्हाव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे. या सर्व मागण्यांसाठी सुमारे ७५ लाख ट्रक व ४० लाख बस एक एप्रिलपासून बंद ठेवणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.