राज्यात शिफारस समितीने शिफारस केलेल्या ३ हजार ११५ खासगी विनाअनुदानित इंग्रजी शाळांवर घालण्यात आलेल्या नव्या अटी शासनाने मागे घ्याव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य इंग्लिश स्कूल असोसिएशनने ४ मार्चपासून राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डी. एस. लहाने यांनी शनिवारी पत्रकार परिषदेमध्य दिली.
यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी महेंद्र जगताप, दिलीप आवळे, अॅड. पटेल तारिक अन्वर उपस्थित होते. विनाअनुदानित इंग्रजी प्राथमिक शाळा चालवण्यासाठी शासनाने मे २०१० मध्ये शिफारस समितीकडे ८ हजार प्रस्ताव पाठवले होते. त्यापैकी ३ हजार ११५ प्रस्तावांची समितीने शिफारस केली. त्यावेळी परिपत्रकात नमूद करण्यात आलेल्या नियमांव्यतिरिक्त या शाळांना नव्या अटी लागू केल्या. या अटी शासनाने मागे घ्याव्यात या मागणीसाठी असोसिएशनने ४ मार्चपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
याबाबत लहाने यांनी सांगितले, ‘‘नव्या अटींमध्ये ग्रामीण भागामध्ये ३ एकर शैक्षणिक परिसर असावा, आणि शहरात १ एकर शैक्षणिक परिसर असावा अशा काही अटी असून शहर आणि मनपा क्षेत्रात या अटी पूर्ण करणे शक्य नाही. दरम्यान शिफारस समितीने प्रस्ताव पाठवल्यामुळे या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. या विषयीचा निर्णय शासनाकडून प्रलंबित ठेवला जात आहे. त्यामुळे शाळांना अजून मान्यता मिळू शकलेली नाही. याबाबत असोसिएशनने न्यायालयातही याचिका दाखल केली आहे.’’

Story img Loader