पिंपरी : भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षाने आठ ते दहा जणांसह वॉशिंग सेंटर चालकाला मारहाण केली. तसेच माजी नगरसेविकेने वॉशिंग सेंटर बंद करण्याची धमकी दिली. हा प्रकार २३ मार्च रोजी दुपारी एकच्या सुमारास पिंपरी येथे घडला.
याप्रकरणी शिबू हरिदास (रा. प्राधिकरण, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, शहर भाजपाचे माजी सरचिटणीस सारंग कामतेकर यांचा मुलगा समर (वय २३), माजी नगरसेविका सीमा सावळे यांच्यासह १५ ते १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हरिदास यांचे पिंपरी एमआयडीसी येथील एच ब्लॉक येथे वॉशिंग सेंटर आहे. त्यांच्याकडे काम करणारी मुले संतोष व चेतन हे गुरुवारी गाडी धुण्याचे काम करत होते. त्यावेळी येथे गाडी धुण्यासाठी आलेल्या समर कामतेकर याने सात ते आठ जणांचा जमाव बोलावून फिर्यादीला शिवीगाळ केली. सीमा सावळे यांनी फिर्यादी यांना त्यांचा वॉशिंग सेंटरचा धंदा बंद करण्याची धमकी दिली. तसेच सावळे यांनी अनुप मोरे याला फोन करून आठ ते दहाजणांना बोलावून घेतले.
हेही वाचा – पिंपरीत लावणी महोत्सवास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
हेही वाचा – पुणे:वारजेतील खंडणीखोर गुंड टोळीवर ‘मोक्का’
अनुप मोरे याने फिर्यादीला मारहाण केली. त्याच्यासोबत आलेल्या जमावापैकी काही जणांनी फिर्यादीला हाताने मारहाण केली. फिर्यादीच्या चेहऱ्यावर बुक्क्यांनी मारहाण केली. एका बाउंसरने फिर्यादीच्या पाठीत बॅट मारली. त्यानंतर काही वेळाने तेथे आलेल्या एकाने फिर्यादीच्या ऑफिसमधील ‘सीसीटीव्ही’ यंत्रणा बंद करून नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.