वडारवाडी परिसरातील रहिवाश्यांमध्ये शाश्वत घनकचरा व्यवस्थापन पद्धतीबाबत जनजागृती करण्यासाठी कचरामुक्त वडारवाडी हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबविण्याचे महापालिकेने निश्चित केले आहे. कचऱ्याचे प्रकार, कचऱ्याचे परिणाम आणि कचरा विलगीकरणाच्या पद्धतीबाबत वडारवाडी परिसरात पुढील तीन महिने जनजागृती केली जाणार आहे.
महापालिका, पुणे प्लॅटफॅार्म फॅार कोलॅबरेटिव्ह रिस्पॅान्स (पीपीसीआर) आणि सोशल लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उप आयुक्त आशा राऊत, पीपीसीआरचे डॅा. सुधीर मेहता, मेहेर पदमजी, मनोज पोचट, प्रदीव भार्गव, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॅा. केतकी घाटगे, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे यावेळी उपस्थित होते.
माहिती, शिक्षण आणि संप्रेषण या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबविला जाणार असून पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत कचरा विलगीकरणाची प्रात्यक्षिके, पथनाट्य आणि कचरा संकलन, विलगीकरण आणि कचरा कुंड्यांची ठिकाणांचे निरीक्षण केले जाणार आहे. घरोघरी कचरा संकलन, ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त कचऱ्याचे वर्गीकरण, वारंवार कचरा पडणाऱ्या (क्रॅानिक स्पॅाट) ठिकाणांचे निर्मूलन या उपक्रमाअंतर्गत केले जाईल. वडारवाडी पिरसरात सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण या उपक्रमामुळे निर्माण होईल, असा दावा महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आला आहे.