पुण्यातील दिघी येथे बेदम मारहाण करत जमिनीवर नाक घासायला लावल्याने एका २९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. सचिन तळेकर असं या तरुणाचं नाव आहे. त्याला चार जणांनी बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी दिघी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. पीडित सचिन तळेकर महानगरपालिकेच्या शाळेत वॉचमनची नोकरी करत होता.
या प्रकरणी किरण रामदास कान्हूरकर, विजय दत्तात्रय तापकीर, अमोल बाळासाहेब तापकीर, अभिनव अर्जुन गायकवाड यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज दिगंबर ढोले यांनी या प्रकरणी फिर्याद दिली.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन तळेकर हा महानगरपालिकेच्या शाळेत वॉचमनची नोकरी करतो. त्याला महानगरपालिकेतील जॉबविषयी माहिती असायची. त्यामुळे नोकरीसाठी आरोपी विजयने नोकरीसाठी आपली नातेवाईक प्राजक्ता यांचे कागदपत्र सचिनला व्हॉट्सअॅपवर पाठवले. यानंतर प्राजक्ता यांनीही सचिनला फोन केला आणि नोकरीविषयी बोलायचं असून शाळेवरती थांबण्यास सांगितलं. तसेच माझ्यासोबत पती आणि इतर नातेवाईक येत आहेत असंही नमूद केलं.
प्राजक्ता यांनी सचिनला असं सांगितल्यानंतर सचिनने तुम्हाला एकट्याला भेटायचं आहे असं उत्तर दिलं. याबाबत प्राजक्त यांनी नातेवाईक आणि पतीला माहिती दिली. सचिनच्या म्हणण्याचा उलट अर्थ काढून चार जणांनी मिळून सचिन तळेकरला बेदम मारहाण केली. तसेच जमिनीवर नाक घासण्यास सांगीतले. यानंतर पीडित सचिनने त्याच दिवशी घरी येऊन टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी तीन जणांना दिघी पोलिसांनी अटक केली आहे.