तुळशीबाग म्हणजे महिलांच्या खरेदीचे हक्काचे ठिकाण, असे समीकरण आहे. पुण्यात बाहेरगावाहून आलेल्या महिला सर्वप्रथम तुळशीबाग कोठे आहे, अशी विचारणा करतात. तुळशीबागेतील गर्दीत होणाऱ्या चोऱ्या, तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी आता तुळशीबागेतील अरुंद गल्ल्यांमध्ये टेहळणी मनोरे उभे करण्यात येणार आहेत. तुळशीबाग व्यापारी असोसिएशन आणि छोटे व्यावासायिक असोसिएशन, विश्रामबाग पोलीस ठाण्यातर्फे महिलांच्या सुरक्षेसाठी टेहळणी मनोरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा >>> पुणे पोलिसांनी केवळ २४ तासांतच शोधला मारेकरी; तीन हजार रुपयांसाठी संगणक अभियंत्याचा खून केल्याचे उघड
व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी, विश्रामबाग पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत तुळशीबागेतील व्यापारी संघटनेने पोलिसांना टेहळणी मनोरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या समोर आणि अक्षय हॉटेलसमोरील मोकळ्या जागेत टेहळणी मनोरे उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला. तुळशीबागेत घडणारे गैरप्रकार आणि चोरट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी मनाेऱ्यांची मदत होणार आहे.
हेही वाचा >>> पुणे : कोरेगाव पार्कमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय ; थायलंडमधील तरुणी ताब्यात
सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने, गुन्हे शाखेचे निरीक्षक दादासाहेब गायकवाड, तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, छोटे व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र धावडे, रवींद्र रणधीर, विनायक कदम, अरविंद तांदळे, किरण चौहान, राजेंद्र साखरीया, महेश दवे, गणेश घम, योगेश मारणे, प्रदीप इंगळे, अमर शहा, जितेंद्र अंबासनकर, प्रसाद हांडे आदी या वेळी उपस्थित होते. तुळशीबागेतील दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गणवेश देण्याची सूचना पोलिसांनी केली. रस्त्यावर उभे राहून विक्री करणाऱ्यांना परवानगी दिली जाणार आहे. तुळशीबागेत सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित आहेत. त्यात आणखी काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भर घालण्याचा निर्णय घेण्यात आला. दुकानात प्राधान्याने महिला कर्मचाऱ्यांना ठेवावे. तुळशीबागेत ध्वनीवर्धक यंत्रणा बसविण्यात येणार असून या यंत्रणेचा वापर करुन सूचना दिल्या जाणार आहेत. महिलांच्या मदतीसाठी भगिनी हेल्पलाईन क्रमांक इलेक्ट्रॉनिक फलकांवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.