लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : दापोडी, फुगेवाडी सांगवीसह जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दोन्ही बाजूने निर्माण होणाऱ्या गृहप्रकल्पांना पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होण्यासाठी शहरातील सर्वात जास्त रहदारीचा मार्ग असलेल्या निगडी ते दापोडी बीआरटी मार्गातून नव्याने स्वतंत्रपणे जलवाहिनी टाकण्याचे काम महापालिकेने घेतले आहे. या मार्गावर मेट्रो, अर्बन स्ट्रीटची कामे सुरू असताना आता जलवाहिनीच्या कामाची भर पडणार असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
पुण्याच्या दिशेला शहराचे टोक असलेल्या दापोडी, फुगेवाडी, सांगवी या भागांत तसेच, पुणे-मुंबई जुन्या महामार्गालगतच्या नवीन गृहप्रकल्पांना पुरेसे पाणी मिळत नव्हते. या भागातून सातत्याने विस्कळीत, अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने निगडी ते दापोडी अशी १३ किलोमीटर अंतरावर जलवाहिनी टाकण्याचे नियोजन केले. निगडीच्या सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रापासून दापोडीपर्यंत बीआरटी मार्गातून भूमिगत जलवाहिनी टाकण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली. आठ ठेकेदारांनी निविदा भरल्या. त्यातील गुडविल कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराची ९.३६ टक्के कमी दराची ५२ कोटी ४२ लाख खर्चाची निविदा स्वीकृत करून या ठेकेदाराला जलवाहिनीचे काम दिले आहे.
या भूमिगत जलवाहिनी टाकण्याच्या कामाची मुदत दोन वर्षे आहे. निगडीतील सेवा रस्त्याने बीआरटी मार्गातून जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यासाठी काही दिवस बीआरटी मार्ग बंद केला जाणार आहे. सेवा रस्त्यावर नाले असलेल्या ठिकाणी पदपथावरून जलवाहिनी टाकली जाणार आहे. जलवाहिनी दापोडीतील जलकुंभापर्यंत (टाकी) नेण्यात येणार आहे. जलशुद्धीकरण केंद्रापासून संत बसवेश्वर महाराज पुतळ्यार्यंत काम सुरू केले आहे. जलवाहिनी एक हजार मिलिमीटर व्यासाची आहे.
वाहतूक कोंडीत भर
निगडी ते मोरवाडी दरम्यान महामेट्रोचेही काम सुरू आहे. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर निगडी, आकुर्डी, पिंपरीतील बीआरटी मार्ग बंद केला आहे. निगडी ते दापोडी मार्गाच्या सेवा रस्त्यावर दोन्ही बाजूने महापालिकेच्या वतीने अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे. पहिल्या टप्प्यातील पिंपरी ते चिंचवड दरम्यानचे काम सुरू आहे. रस्त्यांची रुंदी कमी करून पदपथ व सायकल मार्ग बांधण्यात येत आहे. त्यामुळे हा मार्ग अधिच अरूंद झाल्याने वाहतूक कोंडी होत आहे. आता निगडीपासून सेवा रस्त्यावरून बीआरटी मार्गातून दापोडीपर्यंत भूमिगत जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडण्याची शक्यता आहे.
दापोडी, सांगवीसह जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभारले जात आहेत. येथील नागरिकांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी निगडी ते दापोडी मार्गावर बीआरटीमधून जलवाहिनी टाकण्यात येत आहे. कामाला सुरुवात केली आहे. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी टप्प्याटप्प्यात काम केले जाणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी सांगितले.