पिंपरी : शहरासाठी आंद्रा धरणातून १०० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याच्या राखीव काेटा असताना गेल्या एक महिन्यापासून सातत्याने ३० एमएलडी पाणी कमी मिळत असल्याने पाण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. शहरात पाणीबाणी सुरू आहे. महापालिकेने जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. मात्र, त्यानंतरही यामध्ये काहीच सुधारणा झाली नसल्याने शहरवासीयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला गेल्या सव्वा चार वर्षांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. मावळातील पवना धरणातून ५१०, आंद्रा धरणातून पहिल्या टप्प्यात ७५ तर एमआयडीसीकडून २० असे ६०५ एमएलडी पाणी शहराला देण्यात येते. आंद्रा धरणातील पाणी इंद्रायणी नदीत साेडून निघोजे बंधाऱ्यातून दाेन पंपाद्वारे उचलून ते चिखली जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. तिथे प्रक्रिया झाल्यानंतर जलवाहिन्यांद्वारे पाणी शहराला वितरित केले जात आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून आंद्रा धरणातून ४० ते ४५ एमएलडीच पाणी मिळत आहे. त्यामुळे ३० एमएलडी पाण्याची तूट निर्माण हाेत असल्याने च-हाेली, माेशी, डुडुळगाव, भाेसरी, दिघीसह आदी परिसरातून अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा हाेत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत.
हेही वाचा : पिंपरी : पाणीपट्टी थकबाकीदारांच्या तोंडचे पाणी पळणार; महापालिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
आंद्रा धरणातून पाणी कमी येत असल्याबाबत महापालिकेने जलसंपदा विभागाच्या अधिका-यांशी संपर्क साधला. ठरलेल्या काेट्यानुसार पाणी साेडण्यात येत असल्याचा दावा जलसंपदा विभागाकडून केला जात आहे. धरणातून इंद्रायणी नदीत साेडल्यानंतर मध्येच पाणी जास्त उचलण्याचे प्रमाण वाढले की काय अशी शंका उपस्थित केली जावू लागली आहे. निघाेजे बंधा-यात पाण्याचा पुरेसा साठा हाेत नसल्याने दाेन पंपाऐवजी एकाच पंपाव्दारे पाणी उपसा केला जात आहे.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमधून अपहरण झालेल्या व्यक्तीची बीडमधून सुटका
एमआयडीसीकडून पाणी वाढविले
आंद्रा धरणाचे पाणी घेण्यास सुरूवात केल्यानंतर महापालिकेने एमआयडीसीकडून ३५ एमएलडी ऐवजी ३० एमएलडी पाणी घेण्यास सुरूवात केली हाेती. मात्र, आंद्रा धरणातून कमी पाणी मिळत असल्याने महापालिकेने पुन्हा ३० एमएलडी पाणी घेण्यास पुन्हा सुरूवात केली आहे. त्याचा आर्थिक फटका महापालिकेला बसणार आहे.
हेही वाचा : पिंपरी : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई म्हणाले, हेच न्यायाधीशाचे कर्तव्य…
याबाबत पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे म्हणाले की, शहरासाठी आंद्रा धरणातून १०० एमएलडी पाणी राखीव आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून इंद्रायणी नदीवरील निघाेजे बंधा-यात पुरेसे पाणी येत नाही. त्यामुळे पाण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. इंद्रायणी नदीत कमी पाणी येत असल्याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिका-यांशी संपर्क साधला आहे. यावर ताेडगा काढण्यासाठी आयुक्तांबराेबर बैठकीचे आयाेजन करण्यात येणार आहे.