मराठवाडा आणि दुष्काळ हे जणू समीकरणंच झाले आहे. येथील परिस्थितीचे भयाण वास्तव आपण मागील अनेक वर्षांपासून अनुभवतोय. मात्र यावर मात करणे काही प्रमाणात शक्य होईल असे दिसत आहे. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमुळे मराठवाड्यासह बराच ग्रामीण भाग दुष्काळमुक्त करण्यात यश येत असल्याचे चित्र होते. निवडणूकांच्या काळात विविध पक्षाच्या नेत्यांनीही या कामात आपली राजकीय पोळी भाजून घेतली. मात्र आता कोणतीही निवडणूक नसल्याने वॉटर कप स्पर्धा ही नावापूर्तीच राहिली आहे.

या गोष्टीला बीड जिल्हा, धारूर तालुक्यातील कोळपिंपरी हे गाव अपवाद ठरले आहे. या गावातील शालेय विद्यार्थानी गाव दुष्काळ मुक्त करण्याचा वसा हाती घेतला आहे. यासाठी त्यांनी रोपवाटीका तयार केल्या असून मागच्या पंधरा दिवसात त्यांनी ८०० ते १००० रोपवाटीका तयार केल्या आहेत. गावातील वसुंधरा माध्यमिक विद्यालयातील ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थानी हे चांगले काम करत आदर्श निर्माण केला आहे. सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांनी गावाच्या परिसरातील चिकू, चिंच, सिताफळ, जांभूळ अशा वेगवेगळ्या झाडांच्या बिया जमा करून ८०० ते १००० रोपवाटीक तयार केल्या आहेत. यात विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांनी चांगले मार्गदर्शन केले आहे. तयार केलेल्या रोपवाटीका रस्त्याच्या कडेला आणि शेतात लावण्याचे ठरविले आहे. त्यामुळे वॉटर कपमध्ये त्यांना जास्तीचे गुण मिळणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची विचार आणि काम करण्याची इच्छाशक्ती ही राजकीय नेत्यांच्या एक पाऊल पुढे आहे.

त्यामुळे या विद्यार्थ्यांचा आदर्श गावातील नेत्यांनी घ्यायला हवा. मागच्या वर्षी कोळपिंपरी या गावाने वॉटर कप स्पर्धेत तालुक्यातून पहिला क्रमांक पटकावत लाखो रुपयांचे बक्षीस जिंकले होते. त्यावेळी ग्रामपंचायतीच्या निवडणूका असल्याने नेत्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांच्या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ८ एप्रिल पासून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेच हे तिसरे वर्ष असून २४ जिल्ह्यातील ७५ तालुके आणि ५ हजार ९०० गावे यामध्ये सहभागी होणार आहेत. मागील वर्षीही जवळपास ५०० झाडे लावण्यात आली होती. त्यामुळे यंदा मार्च महिन्यातही पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.

Story img Loader