पुणे : मोसमी पाऊस विलंबाने सक्रिय होण्याची शक्यता विचारात घेऊन शहरात पाणीकपात होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी (२६ एप्रिल) कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पुढील दोन-अडीच महिन्यांतील पाण्याचे नियोजन केले जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जलसंपदा विभाग आणि महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची गेल्या आठवड्यात मंगळवारी (१८ एप्रिल) बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत पाणीकपातीचा निर्णय घेण्याचे महापालिका प्रशासनाने टाळून हा चेंडू पालकमंत्र्यांच्या दरबारी ढकलण्यात आला होता. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांत सध्या एकूण ११.७६ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ४०.३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मोसमी पाऊस विलंबाने सक्रिय झाल्यास हा पाणीसाठा शहर आणि ग्रामीण भागाला पुरू शकणार नाही.

हेही वाचा >>> अंशदान घेऊन पतसंस्थांमधील ठेवींना संरक्षण?, राज्य सरकारकडून लवकरच घोषणा

ग्रामीण भागाला दुसरे उन्हाळी आवर्तन देण्यासाठी जलसंपदा विभागाला सुमारे पाच टीएमसी पाण्याची गरज आहे, तर शहराला पाणी पुरवठ्यासाठी सात टीएमसी पाण्याची मागणी महापालिकेने गेल्या आठवड्यातील बैठकीत केली आहे. उन्हाळ्याचा अद्याप दीड महिन्याचा कालावधी शिल्लक असून या कालावधीत पाण्याचे बाष्पीभवन हाेण्याचे प्रमाण अधिक असते. साधारणपणे दाेन टीएमसी इतक्या पाण्याचे बाष्पीभवन हाेण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

शहरात पाणीगळतीची १३ ठिकाणे

पाण्याची गळती शोधण्यासाठी महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर ‘अकॉस्टिक सेन्सर’ या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने वडगाव जलकेंद्रापासून कात्रज येथील केदारेश्वर पाण्याच्या टाकीपर्यंतच्या मुख्य वाहिनीवर १३ ठिकाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

हेही वाचा >>> जिल्ह्यातील ऐतिहासिक, धार्मिक स्थळांच्या विकासासाठी भरघोस निधी

खडकवासला जलवाहिनीची दुरुस्ती लांबणीवर

महापालिकेने २५ वर्षांपूर्वी खडकवासला ते पर्वती जलकेंद्र अशी १२ किलाेमीटर लांबीची बंद जलवाहिनी टाकली. या जलवाहिनीला गंज चढला असून तिची काही ठिकाणी दुरुस्ती करावी लागणार आहे. या कामाची तीन टप्प्याची निविदा काढण्यात आली हाेती. मात्र निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नाही. या जलवाहिनीचे काम सुरू केल्यानंतर महापािलकेला कालव्यातून प्रतिदिन तीन हजार एमएलडी इतके पाणी उचलावे लागणार आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्ती, रंगरंगाेटीचे काम ऑक्टाेबरनंतर करावे, अशा सूचना जलसंपदा विभागाने केल्या आहेत.

धरणांमधील पाणीसाठा टीएमसी, टक्क्यांत

धरण             टीएमसी            टक्के

टेमघर            ०.२८             ७.६३

वरसगाव ६.८७             ५३.५९

पानशेत            ३.५३             ३३.१५

खडकवासला १.०७            ५४.३९

एकूण             ११.७६            ४०.३३

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water cut canal advisory committee meeting tomorrow pune print news psg 17 ysh