शहरातील पाणीकपातीची अधिकृत घोषणा करण्यासाठी पालकमंत्री आणि महापालिका पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी (४ सप्टेंबर) बैठक होत असून शहराला एक वेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात येईल. त्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी महापालिका प्रशासनाकडून शहरात केली जाईल. दरम्यान, हा निर्णय घ्यायला पालकमंत्री आणि महापौर व पालिकेच्या पदाधिकाऱ्यांमुळे उशीर झाल्याची टीका आता करण्यात येत आहे.
पावसाने दिलेली ओढ व पाणीसाठा यांचा विचार करून पालकमंत्री गिरीश बापट यांनी कालवा समितीची बैठक २२ ऑगस्ट रोजी घेतली होती. मात्र या बैठकीत पाणीकपातीचा निर्णय न घेता याबाबत आणखी पंधरा दिवसांनी निर्णय करावा असे ठरवण्यात आले. पालकमंत्र्यांच्या या निर्णयावर आता टीका केली जात असून त्याच बैठकीत पाणीकपातीचा निर्णय जाहीर करायला हवा होता अशी भूमिका मांडली जात आहे. त्या बैठकीनंतर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तसेच पक्षनेत्यांच्या बैठकीतही पाणीकपातीची मागणी करण्यात आली. मात्र पाणीबचतीसाठी उपाययोजना सुरू करण्याचा निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. त्याच बैठकीत पाणीकपातीचा निर्णय घेता आला असता असेही आता सांगितले जात आहे.
धरणांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा लक्षात घेऊन शहरातील पाणीपुरवठय़ात पंधरा टक्के कपात करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने सोमवारीच घेतला आहे. मात्र या निर्णयाची अद्यापही अंमलबजावणी सुरू झालेली नाही. हा निर्णय महापौरांनी घोषित करावा असे प्रशासनाला सांगण्यात आले आहे आणि महापौर व काही पदाधिकारी सध्या परदेशात गेले आहेत. त्यामुळे या निर्णयाची घोषणा प्रशासनाला करता आलेली नाही. निर्णय घोषित करण्यासाठी महापालिकेत गुरुवारी बैठक बोलावण्यात आली होती. मात्र ती रद्द करण्यात आली. त्यामुळे निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत कार्यवाही झालेली नाही.
पालकमंत्री गिरीश बापट यांनी पाणीकपातीबाबत शुक्रवारी बैठक बोलावली असून महापालिकेत ही बैठक होणार आहे. महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागूल तसेच सर्व पक्षांचे गटनेते व अन्य महापालिका पदाधिकारी, आयुक्त कुणाल कुमार आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती असेल. सप्टेंबर अखेपर्यंत शहरात एक वेळ पाणीपुरवठा करावा व त्यानंतर पाऊस व धरणसाठा यांचा विचार करून एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा अशा प्रकारचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. या प्रस्तावावर बैठकीत विचारविनिमय होऊन त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे गुरुवारी सांगण्यात आले.
वर्षभराचे नियोजन करा
दरम्यान, धरणातील पाणीसाठा विचारात घेऊन शहराला एक वर्षभर पुरेल अशा प्रकारचे नियोजन महापालिका प्रशासनाने करावे अशी मागणी आरपीआयने केली आहे. तसे निवदेन पक्षाचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, महापालिकेतील गटनेता डॉ. सिद्धार्थ धेंडे व अन्य पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी आयुक्तांना दिले. बांधकाम, गाडय़ा धुण्याचे व्यवसाय आदी ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा जो वापर केला जातो तो त्वरित थांबवण्याचीही मागणी आरपीआयने निवेदनाद्वारे केली आहे.
पालिकेकडे पाणीगळतीच्या तक्रारी
पाण्याची गळती होत असल्यास त्याची माहिती महापालिकेला कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार नागरिकांकडून  तक्रारी येत असून आतापर्यंत पंचवीस ते तीस तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा