धरणे शंभर टक्के भरलेली असताना केवळ दोन मंत्र्यांच्या हटवादी भूमिकेमुळेच पुणे शहराच्या पाणीसाठय़ात कपात करण्यात आली असून पाणीपुरवठा नियोजनात तातडीने हस्तक्षेप करावा, अशा विनंतीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. पुणेकरांना पाणीवापराचे निकष सांगणारे पाटबंधारे खाते सिंचनासाठीचे निकष सोईस्कर रीत्या विसरते, अशीही टीका या निवेदनातून करण्यात आली आहे.
यंदा धरणे पूर्ण भरल्यानंतर नदीत पाणी सोडण्याची वेळ येऊनही अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील या मंत्र्यांच्या हटवादी भूमिकेमुळेच पाणीकतीचा निर्णय घेण्यात आला, अशी तक्रार सजग नागिरक मंचने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. गेल्या चार महिन्यांत पुणेकरांनी साडेचार टीएमसी पाणी वापरले आणि त्याच वेळी कालव्यातून आठ टीएमसी पाणी सोडण्यात आले. तरीही धरणात उपलब्ध असलेल्या २९ टीएमसी साठय़ापैकी पुणेकरांना फक्त नऊ टीएमसी आणि सिंचनाला १८ टीएमसी पाणी देण्याची भूमिका घेण्यात आली असून या परिस्थितीकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
पाण्यासाठी दरडोई १५० लिटरचा निकष पुणेकरांना सांगितला जातो. असेच निकष सिंचनासाठी देखील आहेत. प्रति एक हजार हेक्टरसाठी ०.२३ टीएमसी पाणी हा निकष असून तो सोईस्कर रीत्या विसरला जात आहे. पुण्याच्या पाणीगळतीबाबत फक्त ओरड होते. मात्र सिंचनाच्या कालव्यातूनही ५० टक्के गळती होत आहे, याकडे दुर्लक्ष केले जाते. सिंचनाचे पाणी देताना देखील ते मोजून दिले जावे, असे महाराष्ट्र सिंचन व्यवस्थापन कायदा (२००५) सांगतो. त्यानुसार पाणी मोजून देणे आवश्यक असताना खडकवासला पाटबंधारे विभागात मात्र तशी यंत्रणाच अस्तित्वात नाही. अशा अनेक त्रुटी निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत.
..पाणीकपातीची शंका खरी ठरली
धरणांमध्ये चांगला पाणीसाठा झाल्यामुळे शहराला जादा पाणी दिले जात होते. मात्र जादा साठा झाल्यामुळे जे अतिरिक्त पाणी शहराला दिले जात आहे ते वार्षिक करारात मोजले जाऊ नये. अन्यथा हे पाणी मोजले गेल्यास ते वार्षिक मंजूर साठय़ातून वजा केले जाईल, अशी शंका ऑगस्ट महिन्यातच घेण्यात आली होती. काँग्रेसचे गटनेता अरविंद शिंदे यांनी तसे पत्रही महापालिका आणि पाटबंधारे विभागाला दिले होते. ती शंका खरी ठरली असून अतिरिक्त साठा मूळ साठय़ातून वजा करण्यात आल्यामुळे शहरात एक वेळ पाणीपुरवठा सुरू होणार आहे.
पाणीकपातीच्या विरोधात शहर शिवसेनेतर्फे निवेदन
शहराच्या पाणीसाठय़ात कपात करण्यात आल्याच्या निषेधार्थ शहर शिवसेनेतर्फे आंदोलन सुरू करण्यात आले असून जादा पाणीसाठा तातडीने मंजूर करा, या मागणीचे निवेदन मंगळवारी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.
सध्या शहरात दोन वेळा पाणीपुरवठा सुरू असून या पद्धतीत बदल करू नये तसेच पूर्वीप्रमाणेच पाणीसाठा मंजूर करावा, यासह विविध मागण्या शिवसेनेतर्फे करण्यात आल्या आहेत. या संबंधीचे निवेदन मंगळवारी जलसंपदा विभागाला देण्यात आले. पक्षाचे शहरप्रमुख श्याम देशपांडे, अजय भोसले, महापालिकेतील गटनेता अशोक हरणावळ, नगरसेवक योगशे मोकाटे, सचिन भगत, भरत चौधरी तसेच गजानन पंडित, सागर माळकर, संजय मोरे, संदीप मोरे, तानाजी लोणकर, बाळा ओसवाल, नितीन पवार, विलास सोनावणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पाणीकपात मागे घेण्याची मागणी या वेळी केली.
या निर्णयाच्या विरोधात पुणेकरांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन मोर्चाने येऊन संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येईल, असे अशोक हरणावळ यांनी सांगितले.
दोन मंत्र्यांच्या हटवादी भूमिकेमुळेच पाणीकपात
धरणे शंभर टक्के भरलेली असताना केवळ अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील या दोन मंत्र्यांच्या हटवादी भूमिकेमुळेच पुणे शहराच्या पाणीसाठय़ात कपात करण्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-10-2013 at 03:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water deduction from 17th oct