महापालिकेच्या शुद्धीकरण प्रकल्पांमध्ये शुद्ध करून जे लाखो लिटर पाणी नदीत सोडून दिले जाते, त्या पाण्याचा बांधकामांसाठी पुनर्वापर केल्यास पाण्याची मोठी बचत होऊ शकेल. त्या दृष्टीने महापालिका प्रशानाने तातडीने कृती करावी यासाठी आदेश द्यावेत, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
पिण्याचे पाणी बांधकामांना वापरू दिले जाणार नाही, अशी घोषणा सध्या महापालिकेकडून केली जात असून ही जनतेची दिशाभूल असल्याची तक्रार सजग नागरिक मंचने केली आहे. तसे पत्रही त्यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांना दिले आहे. बांधकामासाठी पिण्याचेच पाणी वापरणे गरजेचे आहे, असे महापालिकेनेच यापूर्वी स्पष्ट केले असल्यामुळे ही घोषणा अमलात येऊ शकत नाही. या परिस्थितीचा विचार करून जे पाणी महापालिकेच्या प्रकल्पांमध्ये शुद्ध केले जाते ते आणखी प्रक्रिया करून बांधकामांना वापरण्यायोग्य करावे, अशी सूचना सजग नागरिक मंचने केली आहे.
महापालिकेने एका शुद्धीकरण केंद्रात अशा प्रकारचा प्रतिदिन दोन दशलक्ष लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारल्यास तेथे रोज दहा हजार लिटर क्षमतेचे दोनशे टँकर भरता येतील एवढे पाणी उपलब्ध होऊ शकेल. हे पाणी बांधकामांसाठी वापरता येईल. जेणेकरून पाण्याचा गैरवापर टळू शकेल. हे पाणी बांधकाम व्यावसायिकांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्यास ते त्याचा वापर करतील. या शुद्धीकरण प्रकल्पासाठी दोन कोटी रुपये खर्च येईल. तेवढा निधी महापालिकेने उपलब्ध करून दिल्यास पाण्याचा पुनर्वापर होऊन पाण्याचा गैरवापरही टळेल, असे सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर आणि विश्वास सहस्रबुद्धे यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
बांधकामांना पिण्याचेच पाणी
बांधकामांमध्ये पिण्याचे पाणी वापरू नये अशी सक्ती महापालिकेने केली असली, तरी आयएस कोडमध्ये पिण्यासाठी योग्य असलेले पाणी बांधकामामध्ये वापरण्याबाबत उल्लेख आहे. त्यामुळे मैलापाणी शुद्धीकरण केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी बांधकामाला वापरणे अडचणीचे आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानेच गेल्या वर्षी माहिती अधिकारात दिली होती. ती माहिती लक्षात घेऊन शुद्धीकरण प्रकल्पातील पाण्यावर आणखी एक प्रक्रिया करून ते बांधकामासाठी वापरण्यायोग्य करता येईल, अशीही सूचना सजग नागरिक मंचने केली आहे.
रेल्वेकडून रोज लाखो लिटर पाण्याचा वापर
पुण्यात रेल्वेकडून पिण्याच्या पाण्याचा वापर रोज मोठय़ा प्रमाणात होतो. शहरात येणाऱ्या रेल्वे गाडय़ांच्या बोगी तसेच रेल्वे ट्रॅक धुण्यासाठी रेल्वेकडून रोज लाखो लिटर पिण्याचे पाणी वापरले जाते. रेल्वे स्टेशनजवळच असलेल्या नायडू शुद्धीकरण केंद्रात जे पाणी प्रक्रिया करून शुद्ध केले जाते त्याचा वापर बोगी धुण्यासाठी करावा असा प्रस्ताव संबंधित अधिकाऱ्यांची समक्ष भेट घेऊन महापालिकेकडून रेल्वेला देण्यात आला होता. मात्र त्याला रेल्वे प्रशासनाकडून प्रतिसाद देण्यात आलेला नाही. सध्या असलेल्या टंचाईच्या परिस्थितीत हा प्रस्ताव स्वीकारण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा