लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : सिंहगड रस्त्यावरील ज्या परिसरात गुईलेन बॅरे सिंड्रोमचे (जीबीएस) संशयित रुग्ण वाढत आहेत. त्या भागात पाणीपुरवठा करणाऱ्या ३० खासगी जल शुद्धीकरण प्रकल्पांपैकी (आरओ प्लांट) १९ प्रकल्पांतील पाणी दूषित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत खासगी टँकर, तसेच ‘आरओ’च्या प्रकल्पांवर कडक कारवाई करण्याचा आदेश पाणीपुरवठा विभागास दिला आहे.

दरम्यान, खडकवाला, किरकिटवाडी आणि आजूबाजूच्या परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या खासगी टँकरमधील पाणी दूषित असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. सिंहगड रोड परिसरातील खडकवासला, नांदेड, किरकिटवाडी, नांदोशी, धायरी, डीएसके विश्व, आंबेगाव या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जीबीएस रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे समोर आले आहे. या भागात रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य, तसेच केंद्राच्या पथकांनीदेखील या भागाला भेट देऊन आवश्यक ती उपाययोजना करण्याचा आदेश महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला दिला आहे. या भागातील नागरिकांना ज्या विहिरीतून पाणी दिले जाते, त्या विहिरीच्या पाण्याची तपासणी केली होती. मात्र, हे पाणी दूषित आढळले नाही. त्यानंतर महापालिकेच्या वतीने या भागातील खासगी टँकर पॉइंटमधील पाण्याची तपासणी करण्यात आली होती.

या तपासणीमध्ये संबंधित पाण्यात ई-कोलाय व अन्य जीवाणू असल्याचे आढळले होते. हे पाणी दूषित असल्याचा अहवाल आल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून संबंधित टँकर भरणा केंद्र, तसेच खासगी टँकरमालकांना केवळ लेखी पत्र देण्यात आले होते. तसेच त्यांना पाणी शुद्धीकरणासाठी ब्लिचिंग पावडर नेण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले होते. मात्र, कुठल्याही प्रकारची कडक कारवाई करण्याचे धाडस पाणीपुरवठा विभागाने दाखविले नव्हते.

या गावांमध्ये खासगी जलशुद्धीकरण प्रकल्प चालकांकडून पिण्यासाठी पाणी दिले जात होते. या पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी घेण्यात आले होते. या भागातील ३० प्रकल्पांतील नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांपैकी १९ प्रकल्पांमधील पाणी दूषित असल्याचा अहवाल महापालिकेकडे आला आहे. या प्रकाराची महापालिका आयुक्त डॉ. भोसले यांनी गंभीर दखल घेतली आहे. पाणीपुरवठा विभागाने या सर्व खासगी टँकरमालक, तसेच शुद्धीकरण प्रकल्प चालविणाऱ्यांवर महापालिका कायद्यानुसार कडक कारवाई करण्याचा आदेश डॉ. भोसले यांनी दिला.

संबंधितांवर कारवाई होणार

सिंहगड रस्त्यावरील ‘जीबीएस’चे रुग्ण सापडलेल्या परिसरातील खासगी जलशुद्धीकरण प्रकल्प चालविणाऱ्यांच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यातील १९ प्रकल्पांतील पाणी दूषित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला दिले असल्याचे महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केले.