लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : आंद्रा धरणातून शहरासाठी दररोज शंभर दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याचा कोटा मंजूर असतानाही पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने धरणापासून थेट जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याचे नियोजन केले आहे. जलवाहिनी, जॅकवेल, पंप हाऊस, सब स्टेशन आदी कामांना मान्यता देण्यासाठी महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला मागील साडेपाच वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. शहराची लोकसंख्या वाढत असताना पाण्याची मागणीही सातत्याने वाढत आहे. त्यामुळेच भामा आसखेड धरणातून १६७ आणि आंद्रा धरणातून शंभर असे २६७ एमएलडी पाणी शहरासाठी राखीव करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात आंद्रा धरणातून पाणी शहराला मिळण्यास सुरुवात झाली आहे. या धरणातून इंद्रायणी नदीत पाणी सोडले जाते. ते महापालिका निघोजे येथील बंधाऱ्यावरून उचलत आहे. मात्र, धरणातून १५० एमएलडी पाणी सोडल्यानंतर निघोजे बंधाऱ्याला शंभर एमएलडी पाणी येते. वाटेत पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. त्यामुळे आंद्रातून शंभर एमएलडी पाणी मंजूर असतानाही सद्य:स्थितीत ५० ते ६० एमएलडीच पाणी शहराला मिळत आहे.

आंद्रा धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी आणण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी आंद्रा धरण ते नवलाख उंब्रे येथील ब्रेक प्रेशर टँक या साडेनऊ किलोमीटर अंतराचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. जलवाहिनीच्या मार्गावर एमआयडीसी, शेतकरी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन विभागाची जागा आहे. जलवाहिनी टाकण्यासाठी परवानगी, जागा ताब्यात मिळावी, यासाठी महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे. तसेच आंद्रा धरणाच्या वरील बाजूला मौजे शिरे येथे जॅकवेल, पंप हाऊस, सब स्टेशन अंतर्गत रस्ते यासाठी एक एकर जागा घेण्याचे महापालिकेने नियोजन केले आहे.

२०८ कोटींचा खर्च

इंद्रायणी नदीत पाणी सोडून निघोजे बंधाऱ्यातून महापालिका पाणी उचलते. वाटेत मोठ्या प्रमाणात पाणीगळती, जलप्रदूषण असल्याने ठरलेल्या कोट्याप्रमाणे शहराला पाणी मिळत नाही. त्यामुळे आंद्रा धरणापासून जलवाहिनीद्वारे पाणी आणल्यास पाणी शुद्धीकरणावरील होणाऱ्या खर्चात कपात होईल. नागरिकांना अधिक शुद्ध पाणी मिळेल. या प्रकल्पावर २०८ कोटींचा खर्च होण्याचा अंदाज आहे.

आंद्रा धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी आणण्यासाठी पाटबंधारे विभागाला प्रस्ताव सादर केला आहे. पाटबंधारे विभाग सकारात्मक असून, त्यांच्या मान्यतेनंतर प्रत्यक्ष निविदा प्रक्रियेला सुरुवात केली जाईल, असे पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

Story img Loader