मागील चार दिवसांपासून पुणे शहर आणि धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे धरण क्षेत्रात झपाट्याने पाणीपातळीत वाढ झाली असून खडकवासला धरण ९६ टक्के भरले आहे. यामुळे १० हजार ९६ क्युसेकने नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे नदी पात्रालगत राहणार्या नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा देखील पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला आहे.
पुणे शहराला पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चार धरणांतून पाणी पुरवठा केला जातो. मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने, पुणे शहरावर पाणी संकट निर्माण झाले होते. मात्र गेल्या चार दिवसांपासून शहरात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरण क्षेत्रात पाणी पातळीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे.
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील साठा
पानशेत – ६० टक्के
वरसगाव – ९१.९४ टक्के
टेमघर – ३६.७४ टक्के
खडकवासला – ९६.१७ टक्के
मुंबईकरांसाठी धरणं भरली, पण शहापूर मात्र गेलं पाण्याखाली!
या चारही धरणांचा मिळून १६.३७ टीएमसी इतका पाणीसाठा सद्यस्थितीला असून सरासरी ५८.१८ टक्के इतकी धरणं भरली आहेत. त्याचबरोबर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने, खडकवासला धरणातून १० हजार ९६ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे नदी पात्रालगत राहणार्या नागरिकांनी सतर्कतेचा राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
#WATCH | Maharashtra: Pune’s Khadakwasla Dam overflows due to heavy rainfall pic.twitter.com/UHlyiCrqyW
— ANI (@ANI) July 22, 2021
दरम्यान, एकीकडे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सरासरी ५८ टक्के पाणीसाठा झाला असताना दुसरीकडे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडकसागर, तानसा, भातसा धरण परिसरामध्ये आज दिवसभरात तुफान पाऊस झाला. त्यामुळे या धरणांमधला पाणीसाठा देखील मोठ्या प्रमाणावर वाढला असून मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटल्याचं बोललं जात आहे. शहापूर तालुक्यात गेल्या २४ तासांत तुफान पाऊस झाला असून मुंबई महानगराला पाणी पुरवठा करणारी तानसा व मोडकसागर धरणे भरून वाहू लागली आहेत, तर भातसा धरणात ६५ टक्के पाणी साठा झाला आहे.