शहरात एक दिवसाआड सुरू झालेला पाणीपुरवठा आणि पाण्याचा तुटवडा अशा परिस्थितीत पुणेकरांना पाणीबचतीचे आवाहन केले जात असले, तरी पाण्याचा काळा बाजार करणाऱ्यांबाबत मात्र महापालिका प्रशासनाबरोबरच राजकीय पक्षांनी सोयीस्कर मौन बाळगले आहे. टँकरसाठी करण्यात आलेली जीपीएस बसवण्याची सक्ती गेल्या वर्षी टँकरलॉबीने धुडकावून लावल्यामुळे यंदा त्या विषयात कोणीच बोलायला तयार नाही आणि ही यंत्रणा ज्यांनी बसवली आहे त्या टँकरवर देखरेख करणारी यंत्रणा नाही, अशी परिस्थती आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये निम्माच पाणीसाठा झाल्यामुळे संपूर्ण शहरात सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला आहे. पाणीसाठा कमी असल्यामुळे पाणीबचतीचेही आवाहन पुणेकरांना केले जात असून, पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. पाण्याचा तुटवडा तसेच एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठा अशा परिस्थितीत आता शहरातील टँकरना मागणी वाढणार असून टँकरचालकांकडून दरातही वाढ केली जाणार आहे. गेल्या वर्षीही अशीच परिस्थिती उद्भवली होती. त्या वेळी टँकरचालकांकडून टँकरचा काळा बाजार सुरू झाल्यामुळे त्याला आळा घालण्यासाठी सर्व टँकरचालकांना टँकरवर जीपीएस यंत्रणा बसवणे सक्तीचे करण्यात आले होते. त्या घोषणेचे स्वागतही झाले. तसेच जीपीएसमुळे टँकरचालकांकडून होणाऱ्या गैरप्रकारांवर नियंत्रण आणता येईल असेही सांगण्यात आले होते.
प्रत्यक्षात टँकरचालकांना जी मुदत देण्यात आली होती त्या मुदतीत त्यांनी जीपीएस यंत्रणा तर बसवली नाहीच, उलट राजकीय पक्षांना हाताशी धरून टँकरसाठी ही सक्ती केली जाऊ नये अशी मागणी या व्यावसायिकांनी लावून धरली. त्यामुळे या व्यावसायिकांना राजकीय साथ मिळाली आणि प्रशासनाने त्या सक्तीतून माघार घेतली. पुढे समाधानकारक पाऊस झाल्यानंतर पाणीकपात मागे घेण्यात आली आणि त्यानंतर हा विषय मागे पडला. शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यापूर्वी महापालिकेत दोन-तीन बैठका झाल्या होत्या. तसेच पालकमंत्र्यांनीही दोन वेळा बैठका घेतल्या होत्या. मात्र पाणीगळती रोखणे तसेच पाणी जपून वापरणे या विषयांवरच या बैठकांमध्ये चर्चा झाली. यातील एकाही बैठकीत टँकरवरील जीपीएस सक्तीबाबत चर्चा करण्यात आली नाही. त्यामुळे पुणेकर नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करणाऱ्या प्रशासनाने तसेच राजकीय पक्षांनी टँकरचालकांकडून होणाऱ्या गैरप्रकारांबाबत मौनच बाळगल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या वर्षी करण्यात आलेल्या सक्तीनंतर काही टँकरचालकांनी जीपीएस यंत्रणा बसवून घेतली असली, तरी महापालिका ज्यांना पाणीपुरवठा करते अशा सर्व टँकरवर अद्याप ही यंत्रणा बसवण्यात आलेली नाही.
पुणेकरांनी पाणी जपून वापरण्याच्या सूचना दिल्या जात असतानाच बांधकामांमध्ये पिण्याच्या पाण्याचा वापर होऊ नये यासाठीही आदेश काढण्यात आले आहेत. बांधकामांमध्ये पाण्याचा गैरवापर आढळल्यास कारवाईदेखील केली जाणार आहे. तसेच गाडय़ा धुण्याचे व्यवसाय करणाऱ्यांकडून पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असेल तर तेथेही कारवाई केली जाणार आहे. पाण्याची गळती जेथे आढळेल तेथेही कारवाई केली जाणार आहे. मात्र पाण्याचा गैरवापर करणाऱ्या टँकरचालकांना यातून सूट का असा प्रश्न आता विचारला जात आहे.
देखरेख यंत्रणाही नाही
ज्या टँकरचालकांनी जीपीएस यंत्रणा बसवून घेतली आहे त्याचे टँकर नक्की कोठे भरले जातात, ते कोठे जातात, त्या टँकरमधून कोणत्या भागात पाणी दिले जाते यावर देखरेख ठेवण्यासाठी महापालिकेने यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे. मात्र ती यंत्रणाच महापालिकेने उभी केलेली नाही. त्यामुळे ज्या टँकरवर जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे त्यांची देखरेखच होत नाही, अशी परिस्थिती आहे. ही देखरेख यंत्रणा तातडीने उभी केली जावी.
विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा