पुणे : टेमघर धरणातून होणाऱ्या पाणीगळतीबाबत गळती प्रतिबंधक कामे हाती घेतल्यानंतर गळतीच्या प्रमाणात लक्षणीय घट (९३ टक्के) झाली आहे. मात्र, अद्यापही १९७ लीटर प्रतिसेकंद धरणातून पाणीगळती होत असल्याचे आढळून आले आहे, अशी कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> राज्य सरकारचा अधिकाऱ्यांवर भरवसा नाय?… ‘हा’ घेतला निर्णय

खेड-आळंदीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘पुणे जिल्ह्यातील टेमघर धरणातून मोठ्या प्रमाणात होत असलेली पाणी गळती रोखण्यासाठीच्या प्रभावी उपाययोजनेचे काम प्रगतीपथावर आहे. टेमघर धरणातील गळतीच्या कारणांचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव वि. म. रानडे यांच्या अध्यक्षतेखाली टेमघर धरण तज्ज्ञ समिती (टीडीईसी) स्थापन केली होती. या समितीने धरणाची पाहणी करून अल्पकालीन गळतीप्रतिबंधक उपाययोजना आणि दीर्घकालीन धरण मजबुतीकरण उपाययोजना अशा दोन भागांत दुरुस्ती कामे सुचविली होती.

हेही वाचा >>> केंद्राची लवकरच ‘एवढ्या’ कोटींची दुष्काळी मदत; केंद्रीय पथकाकडून पाहणी पूर्ण

समितीने सुचविल्याप्रमाणे अल्पकालीन गळती प्रतिबंधक उपाययोजनांची कामे आपत्कालीन परिस्थितीत सन २०१७ मध्ये हाती घेण्यात आली होती. या कामासाठी एकूण २५२.६६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी १०१.५१ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.’ दरम्यान, टेमघर धरणातून सन २०१० पासून गळती सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. सन २०१६-१७ मध्ये गळतीचे प्रमाण २५८७ लीटर प्रतिसेकंद एवढे होते. गळती प्रतिबंधक कामे हाती घेतल्यानंतर गळतीच्या प्रमाणात लक्षणीय घट (९३ टक्के) होऊन हे प्रमाण १९७ लीटर प्रतिसेकंद एवढे आढळून आले. पाणीगळती १०० टक्के बंद होण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही प्रगतीत आहे, असेही फडणवीस यांनी उत्तरात म्हटले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water leakage from temghar dam even after spent rs 101 51 crore for repairing work pune print news psg 17 zws
Show comments