पाण्याचे संकट पुन्हा निर्माण होण्याची चिन्हे; टेमघर रिकामे; पानशेत, वरसगाववरच भिस्त

मागील वर्षी शेवटच्या टप्प्यामध्ये चांगला पाऊस झाल्याने पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील धरणे शंभर टक्के भरली होती. यंदा उन्हाळ्याच्या तोंडावर या धरणातील पाणीसाठा घटला असून, सद्य:स्थितीत या धरणांमध्ये केवळ ४० ते ४५ टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे. तीव्र उन्हाळ्यामुळे होणारे पाण्याचे बाष्पीभवन आणि पाण्याची वाढती गरज लक्षात घेता यंदाही पाऊस लांबल्यास पुन्हा पाण्याचे संकट निर्माण होण्याची चिन्हं आहेत. दुरुस्तीसाठी सध्या टेमघर धरण रिकामे करण्यात आले आहे. त्यामुळे पानशेत आणि वरसगाव या दोन धरणांवरच पाण्याची भिस्त आहे.

मागील वर्षी पाऊस लांबल्याने भीषण पाणीसंकट निर्माण झाले होते. धरणातील पाणीसाठा लक्षात घेता पुणेकरांवर पाणीकपात लागू केली होती. त्यानुसार पुणेकरांना सुमारे दहा महिने एकवेळ पाणीपुरवठा करण्यात आला. याच कालावधीत धरणांमध्ये केवळ पाच टीएमसी (अब्ज घटफूट) पाणीसाठा असताना दौंडसाठी एक टीएमसी पाणी कालव्याद्वारे सोडण्यात आले होते. यावरून बराच राजकीय वादही रंगला. जूनचा पूर्ण महिना आणि जुलैचा पंधरवडाही कोरडा गेल्याने पाणीसंकट आणखी वाढले. त्यामुळे पुण्यात आणखी पाणीकपातीची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, जुलैच्या अखेरीस आणि ऑगस्टमध्ये चांगला पाऊस झाल्याने धरणांतील पाण्याची पातळी सुधारली.

pune-dam-chart

ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पाऊस कायम राहिल्याने खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा जमा झाला. सप्टेंबरच्या मध्यावर पानशेत, वरसगाव आणि खडकवासला धरणांमध्ये शंभर टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाला. त्यामुळे धरणांतून विसर्गही करण्यात आला. त्यानंतर पाणीकपात दूर करून पुणेकरांना दररोज दोनदा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. सप्टेंबर २०१६ मध्ये चारही धरणांमध्ये २८ टीएमसी पाणीसाठा होता. त्यातील टेमघर धरणातून पाण्याची गळती होत असल्याने धोकादायक स्थिती लक्षात घेता या धरणाच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आल्याने हे धरण रिकामे करण्यात आले. यंदा सुरुवातीपासूनच तीव्र उन्हाळा सुरू झाल्याने पाण्याची बाष्पीभवनही वाढले आहे.

सहा महिन्यांत धरणातील पाणीसाठा सुमारे १७ टीएमसीने कमी झाला आहे. तीन धरणांमध्ये सद्य:स्थितीत ११.०८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.

Story img Loader