पुणे जिल्ह्य़ातील धरणांच्या क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने बहुतांश जलाशय पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे विविध धरणांमधून पाणी सोडणे सुरूच असून, त्याचा परिणाम म्हणून खालच्या बाजूला असलेले बहुचर्चित उजनी जलाशयातील उपयुक्त पाणीसाठा या हंगामात पहिल्यांदाच शून्याच्या वर आला आहे. या धरणात बुधवारी सकाळी दीड टक्के उपयुक्त साठा होता.
पुण्याच्या परिसरात बुधवारी, सलग चौथ्या दिवशी दमदार पाऊस पडला. विशेषत: धरणांच्या क्षेत्रात तो संततधार होता. त्यामुळे भरण्याच्या मार्गावर असलेल्या धरणांमधून पाणी सोडणे सुरू ठेवणे भाग पडले. मुळशी व पवना धरणांमधून पाणी सोडण्याचा वेग वाढवण्यात आला. मुळशीतून बुधवारी सायंकाळी १२ हजार घनफूट प्रतिसेकंद (क्युसेक) वेगाने, तर पवनेतून ७८४६ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत होते. त्यामुळे मुळा व पवना नद्यांच्या पातळीत वाढ झाली. त्याचा परिणाम पिंपरी-चिंचवड भागातील सांगवी, पिंपरी येथे झाला. खडकवासला धरणातूनही सलग तिसऱ्या दिवशी पाणी सोडणे सुरू होते. हा वेग सुमारे पाच हजार क्युसेक होता. भीमा नदीवरील चासकमान धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा वेग ५५५० क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला. त्यामुळे भीमा नदी या हंगामात बुधवारी पहिल्यांदाच दुथडी भरून वाहिली.
या वरील धरणांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने खालच्या बाजूला सोलापूर व पुणे जिल्ह्य़ांच्या सीमेवर असलेल्या उजनी धरणातील पातळीत वाढ झाली. या धरणातील उपयुक्त पाणीसाठा गेल्या उन्हाळ्यानंतर पहिल्यांदाच शून्याच्या वर आला. या धरणात १५ जून रोजी उणे २८ टक्के उपयुक्त साठा होता. त्यात वाढ होऊन तो दीड टक्क्य़ांवर पोहोचला. वरच्या धरणांमधून पाणी सोडणे सुरू असल्याने उजनीच्या साठय़ात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, असे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता ईश्वर चौधरी यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्य़ातील विविध धरणांमध्ये बुधवारी असलेल्या साठय़ाची टक्केवारी पुढीलप्रमाणे – खडकवासला ९३, पानशेत ९०, वरसगाव ७४, पवना ८८, नीरा देवघर ८४, भाटघर ८२, चासकमान ८७, वीर ८६.
पुण्यात पावसाच्या सरी
पुण्यात बुधवारी दिवसभर पावसाच्या सरी बरसत होत्या. बुधवार सकाळर्पयच्या चोवीस तासांत ३०.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यानंतर बुधवारी सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठ दरम्यान ८.३ मिलिमीटर पाऊस पडला. पुण्यात पुढील दोन दिवसांतही मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वेधशाळेतर्फे वर्तवण्यात आली आहे.
पुण्यातील धरणांमधून पाणी सोडणे सुरूच
बहुचर्चित उजनी जलाशयातील उपयुक्त पाणीसाठा या हंगामात पहिल्यांदाच शून्याच्या वर आला आहे. या धरणात बुधवारी सकाळी दीड टक्के उपयुक्त साठा होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-07-2013 at 02:33 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water level in ujani dam above