समान पाणीपुरवठा योजनेची असमानता अधोरेखित
अविनाश कवठेकर
पुणे : शहराच्या सर्व भागांना समन्यायी पद्धतीने आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी शहरात जलमापके बसविणे अपेक्षित असताना शहराच्या केवळ ६० टक्के भागातच जलमापके बसविण्यात येणार आहेत. चाळीस टक्के क्षेत्रावर असलेल्या झोपडपट्टी भागाला जलमापके बसविण्याच्या प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे समान पाणीपुरवठय़ाच्या मूळ उद्देशालाही हरताळ फासला जाणार असून योजनेतील असमानाताच त्यामुळे अधोरेखित झाली आहे.
समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात निवासी आणि व्यावसायिक क्षेत्र मिळून साडेतीन लाख जलमापके बसविण्यात येणार आहेत. जलमापके बसविण्याची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी महापालिके कडून सर्वेक्षण करण्यात आले होते. खासगी कं पन्यांना जलमापके बसविण्याचे काम देण्यात आले असून परदेशी कं पनीकडून साडेपाच कोटी रुपये खर्च करून जलमापकांची खरेदी करण्यात आली आहे.
सध्या शहरात ४० हजार जलमापके बसविण्यात आल्याचा दावा महापालिके च्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आला आहे. वास्तविक सर्व भागांसाठी जलमापके बसविणे आवश्यक असताना फक्त साठ टक्के भागातच ते बसविण्यात येणार आहेत. चाळीस टक्के क्षेत्रातील झोपडपट्टी भागाला यातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे योजनेचा समान पाणीपुरवठय़ाचा उद्देश कसा साध्य होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राजकीय गणितातून झोपडपट्टी भागाला वगळण्यात आले असल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. योजनेच्या नावाप्रमाणे सर्व भागात जलमापके बसविणे योग्यच आहे. मात्र ते बसविले जाणार नाहीत, ही वस्तुस्थिती महापालिके चे अधिकारीही मान्य करत आहेत.
मुबलक पाणी अन कमतरताही..
जलमापके बसविल्यामुळे हवे तेव्हा पाणी मिळेल, वीज देयकाप्रमाणे पाणी वापराची नोंद घेऊन देयके दिली जातील. त्यासाठी जलमापके उपयुक्त ठरणार आहेत. सध्या जलमापके बसविण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी नागरिक आणि नगरसेवकांकडूनही ते बसविण्यास विरोध होत आहे. ज्या ठिकाणी जलमापक बसविण्यात आले आहेत त्यातील काही ठिकाणचे जलमापक चोरीला गेले आहेत किं वा नागरिकांनी ते काढून टाकले आहेत, या परिस्थितीमध्ये समान पाणीपुरवठा कसा होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.